घरफोडीतील आरोपींना मुद्देमालासह अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:12+5:302021-06-29T04:20:12+5:30
गोंदिया : शहरातील हेमू कॉलनी येथील कन्हैयालाल किसनचंद चांदवानी (६०) यांच्या घरातून २.५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना ...
गोंदिया : शहरातील हेमू कॉलनी येथील कन्हैयालाल किसनचंद चांदवानी (६०) यांच्या घरातून २.५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या त्यांच्याकडून चांदवानी यांच्यासह अन्य ठिकाणच्या चोरीतील ३.१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
कन्हैयालाल चांदवानी यांच्या मुलाचे लग्न असल्याने २४ जून रोजी रात्री ९.३० वाजता ते घराला कुलूप लावून गेले होते. २५ जून रोजी घरी परत आल्यावर त्यांच्या घरातील आलमारीतून सोन्याचे दागिने व रोख असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. प्रकरणाचा तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बबन सुरेश भागडकर (२४, रा. मरारटोली) व सुनील सुखनंदन गेंडरे (२०, रा. झोपडी मोहल्ला) यांना ताब्यात घेऊन २५ जून रोजी अटक केली. विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली व त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७८ हजार रुपये असा दोन ५३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तर यासह ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व रोख १६ हजार ५०० रुपये असा ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज मिळून आला. पोलिसांनी असा एकूण तीन लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.