‘त्या’ मृत पक्ष्यांचा दफनविधी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:08+5:302021-02-27T04:40:08+5:30
अर्जुनी मोरगाव : बोडगाव सुरबनच्या शृंगारबांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या दोन विदेशी पक्ष्यांचा शुक्रवारी वनविभागाने दफनविधी केला. मृत पक्षी कुजलेल्या ...
अर्जुनी मोरगाव : बोडगाव सुरबनच्या शृंगारबांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या दोन विदेशी पक्ष्यांचा शुक्रवारी वनविभागाने दफनविधी केला. मृत पक्षी कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. अळ्या लागल्या असल्याने त्यांचे अवयव फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविता येऊ शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शृंगारबांध तलावात दोन विदेशी पक्ष्यांचा मृत्यू या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने सर्वप्रथम शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच वनविभाग खळबळून जागे झाले. गोठणगावच्या वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांनी शुक्रवारी सकाळी सहकारी कर्मचाऱ्यांसह तलावाला भेट दिली. त्यांना दोन विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळून आले. मात्र, हे पक्षी कुजक्या व सडलेल्या अवस्थेत होते. पक्ष्यांना अळ्या लागल्या होत्या. नी पंचनामा केला. केशोरीचे पशुसंवर्धन पर्यवेक्षक बडोले सोबत होते. मृत पक्ष्यांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यासारखे नव्हते. त्यामुळे या विदेशी पक्ष्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते कळायला मार्ग नाही. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. एक लहान तर दुसरा कोंबड्याच्या आकाराचा असे दोन मृत पक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय नियमाप्रमाणे त्यांना जमिनीत खड्डा तयार करून पुरण्यात आले. संसर्ग टाळण्यासाठी जमिनीत पुरताना कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. तलावातील इतर पक्ष्यांवर देखरेख ठेवण्यासाठी शुक्रवारी दुपारी वन कर्मचाऱ्यांचे आणखी एक पथक तलावाकडे जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मृत पक्ष्यांना जमिनीत पुरतेवेळी वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील, पशुधन पर्यवेक्षक बडोले, क्षेत्र सहायक डी.एम. बुरेले, वनरक्षक हटवार, देशमुख, मुंडे, वनमजूर उपस्थित होते.
......
पक्ष्यांच्या मृत्यूचे रहस्य कायम
मृत पक्ष्यांवर सोपस्कार पार पडले असले तरी त्यांचा मृत्यू हा नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पक्ष्यांचा मृत्यू हा चार ते पाच दिवसांपूर्वीच झाला असण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेली एकमेव सारस जोडी कीटकनाशक औषधयुक्त धानबिया खाल्ल्याने मृत्युमुखी पडली होती. त्यांचाही वावर याच परिसरात होता. असले प्रकार घडत असताना शासकीय यंत्रणा निद्रावस्थेत होती काय, असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे. याविषयी पक्षिप्रेमींनीही खंत व्यक्त केली.