वेल्डिंगचे काम करताना टिप्पर जळून खाक
By अंकुश गुंडावार | Published: February 5, 2024 05:03 PM2024-02-05T17:03:29+5:302024-02-05T17:05:26+5:30
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
गोंदिया : एका टिप्परला वेल्डिंग करण्याचे काम सुरु असताना अचानक टिप्परला आग लागली यात संपूर्ण टिप्पर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.५) दुपारी ११:४५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
गोंदिया तालुक्यातील दासगाव(बु.) येथे माकडी येथील नागपूरे यांचे वेल्डींगचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर एका टिप्पर वेल्डींग करण्याचे काम सोमवारी दुपारी ११:४५ वाजताच्या सुमारास सुरु होते. दरम्यान वेल्डींग करीत असताना अचानक टिप्परला आग लागली. या आगीने क्षणातच रौद्र रुप धारण केले. यात संपूर्ण टिप्पर जळून राख झाले. दरम्यान नागपूरे व गावकऱ्यांनी या घटनेची माहिती गोंदिया अग्निशमन दलाला दिली. तसेच गावकऱ्यांनी सुध्दा आग विझविण्याचा प्रयत्न मात्र आगीने रौद्र रुपधारण केल्याने यात अग्निशमन वाहन येईपर्यंत संपूर्ण टिप्पर जळून राख झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र संपूर्ण टिप्पर जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे.