सिव्हिल लाईन्समध्ये ‘द बर्निंग ट्रॅक्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:05 PM2018-05-06T21:05:38+5:302018-05-06T21:05:38+5:30
ट्रॅक्टरमधील तणस वीज तारांना लागून तारांच्या आपसातील स्पार्कमुळे तणसाने पेट घेतला. शहरातील सिव्हील लाईन्समधील काका चौक परिसरात रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. परिसरातील नागरिक व अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी घटना टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ट्रॅक्टरमधील तणस वीज तारांना लागून तारांच्या आपसातील स्पार्कमुळे तणसाने पेट घेतला. शहरातील सिव्हील लाईन्समधील काका चौक परिसरात रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान ही घटना घडली. परिसरातील नागरिक व अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी घटना टळली. या घटनेनंतर लोकांनी ‘ द बर्निंग ट्रॅक्टर’ हा एकच शब्द तोंडातून काढला.
सिव्हील लाईन्स परिसरातील राजू डोये यांच्याकडे तणसाने भरलेला ट्रॅक्टर आला होता. ट्रॅक्टरमध्ये तणस लबालब भरलेले असल्यामुळे तणस वीज तारांना लागत होते. यातच वीज तार आपसांत घासल्या गेल्या व त्यातून स्पार्क झाल्यामुळे ट्रॅक्टरमधील तणसाने पेट घेतला. रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजतादरम्यान घडलेल्या घटनेत वेळीच लोकांनी आपल्या घरातून पाईप लावून तणसावर पाणी मारण्यास सुरूवात केली. तर लगेच ट्रॅक्टरचे इंजीन ट्रॉलीपासून वेगळे करण्यात आले. अग्निशमनही दाखल झाल्यानंतर त्यातूनही तणसावर पाणी मारण्यात आले. मात्र तणस आतल्या आत धगधगत असल्यामुळे लोकांनी हातांनी व फावड्याने तणस ट्रॉलीतून खाली पाडून आगीवर नियंत्रण मिळविले.
ही घटना घडली ती बोळ अरूंद असून दोन्ही बाजूंनी घरे आहेत. शिवाय वीज ताराही खाली असल्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले नसते तर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
तणसाला लागलेली आग विझविण्यासाठी दीपक कदम, नवरतन अग्रवाल, सागर कदम, गुड्डू कटरेसह नेचवाणी, थदानी, केडीया यांच्या परिवारातील सदस्यांनीही सहकार्य केले.