जलाऊ लाकडांसाठी जंगलाची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:38 PM2019-04-25T20:38:01+5:302019-04-25T20:38:37+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. प्रशासन कोट्यावधीचा निधी वृक्षारोपणावर खर्च करते. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घनदाट जंगलेही आता ओसाड होत आहेत. सर्वत्र अधिकारी असूनही मात्र लाकडांची कत्तल कशी होते असा प्रश्न जनमानसांत आहे.
शासनाने दोन कोटी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा विडा उचलला होता. मात्र रानामध्ये लावलेल्या वृक्षांची कत्तल होत आहे. काही ठिकाणी जंगलामध्ये लावलेली झाडे सुकून गेली. तर काही ठिकाणी फक्त खड्डे खोदल्याचे दिसत आहेत. अर्धवट काम करून पूर्ण मोबदला घेण्यात आला आहे. कागदोपत्री माहिती पूर्ण करून अधिकऱ्यांनी स्वत:चे खिसे गच्च भरल्याची चर्चा जनमानसात आहे. एकीकडे शासन दिवसेंदिवस वाढत्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी झाडांची लागवड करते, तर दुसरीकडे सरपणासाठी जंगलांची कत्तल होत आहे. झाडांची कत्तल थांबवावी म्हणून शासनाने उज्वल गॅस योजना चालू केली. मात्र गरजू व गरिबांना त्याचा पूरेपूर फायदा न मिळाल्याने आजही अनेक गरजू या योजनापासून वंचीत असल्याने स्वयंपाकासाठी जंगलांची कत्तल थांबण्याऐवजी वाढत चालली आहे.
प्रशासनाने गरजू व गरीबांना उज्वला योजनापासून वंचीत न ठेवता या योजनेचा लाभ द्यावा. सरपणासाठी जंगलाची कत्तल केली जाते याकडे वनविभागाने लक्ष देऊन होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.