बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:01+5:302021-01-10T04:22:01+5:30
शहरातील नाल्यांची सफाई करा गोंदिया : दिवाळीच्या पूर्वीपासून शहरातील काही भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये ...
शहरातील नाल्यांची सफाई करा
गोंदिया : दिवाळीच्या पूर्वीपासून शहरातील काही भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये केरकचरा भरला असून पाणी साचून आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे नगर परिषदेने लक्ष केंद्रित करुन नाल्यांची सफाई करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शहरवासी करीत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यातच दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फटाक्यांचा कचरा नालीत जाऊन साचला आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संदर्भात उपायोजना म्हणून नगर परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
लाभ घेतलेल्यांना पुन्हा लाभ नाही
बोंडगावदेवी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. तालुक्याला दोन रोपवाटिकांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला आहे. यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटिकाधारक शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खासगी रोपवाटिका राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोखरा किंवा इतर योजनेतून संरक्षित शेती शेडनेट व हरितगृह घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार नाहीत असे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे
भंभोळी ते चांदोरी रस्त्याची दुर्दशा
मुंडीकोटा : जवळील ग्राम भंभोळी ते चांदोरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून हा रस्ता जीर्ण झाला आहे. रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकायदायक ठरत आहे.
वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली
नवेगावबांध : गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून अगदी सकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरणाऱ्यांच्या गर्दीने शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गजबजून गेलेले दिसत आहेत. कोरोना काळात ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी सकाळी फिरण्याचा उपयोग होत असल्याचे अनेकांनी सांगितले.
निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले
सालेकसा : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृध्द व दिव्यांगांना विशेष साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अमलात आणली जात आहे. या अंतर्गत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांचे अर्ज भरून घेतले.
महिलांना मिळतोय रोजगार
तिरोडा : सेंद्रिय भाजीपाल्याची वाढती मागणी व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने याच बाबीला हेरून अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा ग्राम बेरडीपार येथील ५० महिलांना परसबाग लागवडीचे प्रात्यक्षिक देऊन भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे आता महिलांना परसबागेतूनही रोजगार मिळणार आहे.
नाल्यांवर अतिक्रमण
अर्जुनी-मोरगाव : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे नाल्याची सफाई करताना अडचण होते. परिणामी नाल्या बरबटल्या आहेत.
...
डुंडा जंगलातून अवैध वृक्षतोड सुरुच
पांढरी : या परिसरातील डुंडा जंगलामध्ये सागवन, बिजा, येन, धावडा व इतर प्रजातीचे मौल्यवान वृक्ष आहेत. या मौल्यवान सागवनाची कत्तल मागील काही दिवसांपासून सर्रासपणे सुरु आहे.
......
एचआयव्ही बांधितांना मदत
गोंदिया : कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. एचआयव्हीबाधित रुग्ण तसेच गरजूंना रुग्णांना औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करुन दृष्टी बहुउद्देशिय संस्थेने मदत केली.
......
माेकाट जनावरांचा ठिय्या
गाेरेगाव : तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रस्त्यावर गावातील नागरिक जनावरे बांधतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. यासंबंधी अनेकदा नगर पंचायकडे तक्रार केली पण दखल घेतली नाही. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.
.....
गावकऱ्यांनी तयार केला वनराई बंधारा
मुंडीकोटा : जवळील ग्राम सोनेखारी येथे कृषी मंडळ कार्यालयाच्या मार्गदर्शनात आदिवासी महिला बचत गटातील महिलांनी गावातील नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा तयार केला. या बंधाऱ्यामुळे गावातील जनावरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तर महिलांना कपडे धुण्याची व्यवस्था होणार असून पाणी टंचाईची समस्या ही मार्गी लागणार आहे.
.....
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
परसवाडा : तिरोडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने नुकताच कार्यक्रम घेण्यात आला. यात शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शीला पारधी होत्या. या वेळी प्रामुख्याने छाया रंगारी,उपविभागीय कृषी अधिकारी बी.एल.पाटील, तालुका कृषी अधिकारी के.एन.मोहाडीकर,वाय.बी. बावनकर,कृषी सहायक रजनी रामटेके, उमेश सोनवने, अरविंद उपवंशी उपस्थित होते.
......
श्रमदानातून बांधला बंधारा
सडक-अर्जुनी : जनावरांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी जांभडी दोडके गावातील मंगरु गावड यांनी श्रमदान करुन बंधारा तयार केला. गावातील जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी १० दिवसात बंधारा तयार करुन जनावरांच्या पाण्याची सोय केली. बंधाऱ्यात तीन फूट पाणी आहे. मंगरुने स्वत: श्रमदान करुन हा बंधारा तयार केला. या बंधाऱ्याचा उपयोग जंगलातील वन्य प्राणी व गावातील जनावरांसाठी झाला आहे.