रस्त्याअभावी बसफेऱ्या बंद
By Admin | Published: October 5, 2016 01:28 AM2016-10-05T01:28:33+5:302016-10-05T01:28:33+5:30
तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे.
रस्त्यासाठी निधी द्या : कैलास पटले यांची मागणी
इंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालणे कठीण झाले असून एसटीच्या बसफेऱ्यासुध्दा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्खनन विभाग यांनी निधी उपलब्ध करून त्वरित रस्ता दुरूस्त करावी, अशी मागणी क्षेत्रातील नागरिकांसह जि.प. सदस्य कैलास पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
अर्जुनी टंकीटोलीपासून पिपरीया नदीघाटापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाच ते सहा किमीचा डांबरीकरण रस्ता चांगला होता. या रस्त्यावरून तिरोडा ते सावरा-पिपरीया एसटीच्या दिवसातून चार बसफेऱ्या व मानव विकासच्या दोन बस फेऱ्या सुरू होत्या. सदर रस्ता महाराष्ट्र ते मध्यप्रदेशच्या सीमेला वैनगंगा नदीकाठावरील पिपरीया या गावाशी जोडला आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची दररोज ये-जा जास्त असून मुख्यत: अर्जुनी या गावांशी जास्त संपर्क आहे.
मागील उन्हाळ्यापासून पूर्ण पावसाळ्यापर्यंत रेती कंत्राटदारांनी वैनगंगा नदी काठावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू ठेवली. यात डांबरीकरणाचा रस्ता पूर्णत: खराब झाला व मोठमोठे खड्डे पडले. या संदर्भात मागील दोन महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला व जिल्हाधिकारीऱ्यांना पत्राद्वारे रस्ता दुरूस्ती व रेती वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु याकडे सदर विभागाने मुळीच लक्ष दिले नाही. आज या रस्त्यावरील सर्व वाहतूक म्हणजे एसटी बसेस बंद केल्या आहेत.
अर्जुनी गावाजवळील शाळेच्या समोरील व सुभाष तिडके यांच्या घरासमोरील रस्त्यावर रेती कंत्राटदारांनी रस्त्याच्या खड्ड्यांत दगड व मुरुम घातले होते. परंतु रेतीच्या ट्रकमुळे व सततच्या पावसाने तिथे आणखी मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात अनेक दुचाकी वाहन चालक पडले व गंभीर जखमीसुध्दा झाले आहेत.
अर्जुनीच्या रस्त्याच्या शेवटच्या घरापासून तर पिपरीयापर्यंतचा पूर्ण रस्ता खड्ड्यांनी चिखलांचा झाला आहे. येथून पायी चालणे कठीण झाले तर वाहन कसे चालवावे, हेच कळत नाही. रेतीघाटामुळे शासनाला लाखोचा निधी मिळाला. परंतु येथील नागरिकांचे बेहाल झाले आहेत. लोकांना चिखलातून मार्ग शोधावे लागत आहे.
विद्यार्थी व नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सदर गावांना भेट देऊन येथील समस्या जाणून घ्यावी व अर्जुनी ते पिपरीया हा रस्ता दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून रस्ता दुरूस्त करावे व पूर्ववत बसफेऱ्या व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जि.प. सदस्य व सरपंच अर्जुनी, सावरा, पिपरीया यांनी केली आहे. (वार्ताहर)