बस स्थानकाअभावी तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 01:18 AM2017-02-11T01:18:22+5:302017-02-11T01:18:22+5:30
राष्ट्रीय महामार्ग-६ व गोंदिया-बल्लारशाह लोहमार्गावर सौंदड हे गाव आहे. चहुबाजूचे प्रवाशी येथील बस थांब्यावर गर्दी करतात.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : राष्ट्रीय महामार्ग असूनही गावाची प्रगती खुंटली
सौंदड : राष्ट्रीय महामार्ग-६ व गोंदिया-बल्लारशाह लोहमार्गावर सौंदड हे गाव आहे. चहुबाजूचे प्रवाशी येथील बस थांब्यावर गर्दी करतात. मात्र सौंदड येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची मोठीच तारांबळ उडते. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.
एसटीचा प्रवास हा सुरक्षिततेचा प्रवास म्हणून ओळखला जातो. प्रवाशांच्या सोयीसाठी गाव तिथे बस स्थानक तयार करण्यात आले. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे बस स्थानक नाही. सन २०१३ मध्ये महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले. तेव्हापासून अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही बस स्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना उन, वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक समस्यांना तोंड देत रस्त्यावरच उभे रहावे लागते. मात्र लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देवून ग्रामस्थांची केवळ दिशाभूल अनेक वर्षांपासून करीत आहेत.
महामार्गाच्या कडेला उभे राहून प्रवासी तासनतास एसटीची वाट बघतात. तर इतर प्रवासी बसायचे कुठे, उभे रहायचे कुठे, याचा विचार करीत असतात. कित्येकदा प्रवासी झाडाच्या सावलीमध्ये लांब दूरवर किंवा पानटपरीचे आश्रय घेवून बसची वाट बघताना दिसून येतात. त्यामुळे त्यांना नाहकच त्रास सहन करावा लागतो. याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची चांगलीच कुचंबना होताना दिसून येते.
सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड गाव सर्वाधिक लोकसंख्येचे आहे. नागपूर ते गोंदिया, नागपूर ते देवरी, गोंदिया ते बल्लारशाह असा लोहमार्ग या ठिकाणाहून गेलेला आहे. चहुबाजूने प्रवास करणारे प्रवासी सौंदड गावाहूनच प्रवास करतात. मात्र येथे अद्यापही बस स्थानक नसल्याने मोठी गैरसोय होते. दूरच्या प्रवाशांचे नेहमीच आगमन येथे होते. एकीकडे नवेगावबांध अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, तर दुसरीकडे कचारगड, दुर्गाबाई डोह, प्रतापगड, हाजराफॉल व अनेक पर्यटन स्थळे तसेच देवस्थानांमध्ये सौंदड गावातूनच प्रवाशांना प्रवासाचे साधन उपलब्ध होते. मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या गावाची प्रगती खुंटत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)