ग्रामीण भागातील बसेस अद्याप स्थानकातच उभ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:16+5:302021-06-25T04:21:16+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून राज्य शासनाने अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही कोरोनाचा ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरू लागला असून राज्य शासनाने अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही कोरोनाचा आता प्रभाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये जिल्ह्याचाही समावेश आहे. येथील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. यातच आता प्रवासी वाहतुकीला परवानगी मिळाल्याने राज्य रस्ते महामंडळाच्या बसेसही पुुन्हा रस्त्यावर आल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातून नागरिकांनी पूर्वीप्रमाणे गावाबाहेर निघणे कमी केल्याने ग्रामीण भागातील बसेसला पाहिजे तसा प्रतिसाद आजही मिळत नसल्याने दिसत आहे. अशात महामंडळाने अशा भागांतील फेऱ्या बंद ठेण्याचे आदेश आगारांना दिले आहे. त्यानुसार गोंदिया आगाराने ग्रामीण भागातील फेऱ्या बंद ठेवल्या असून ३१ बसेस आजही स्थानकातच उभ्या आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून ग्रामीण भागातील जनता आपल्या शेतातच व्यस्त आहे. त्यामुळे सध्या तरी बसेसला प्रतिसाद मिळणे कठीणच आहे. मात्र प्रवासासाठी एसटीपेक्षा अधिक भरवशाचे दुसरे साधन नसल्याने लवकरच बंद असलेल्या मार्गांवरही बस पुुन्हा धावणार.
-------------------------------
या गावांच्या फेऱ्या आहेत बंद
ग्रामीण भागात प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याने डिझेलचा पैसा निघणेही आजघडीला कठीण झाले आहे. अगोदरच आगाराला जबर फटका बसला असून आता कोठेतरी थोडीफार आवक सुरू झाली आहे. मात्र बोळूंदा, दवनीवाडा, हिरापूर, बोरगाव, सोनबिहरी यासारख्या गावांतील फेऱ्यांना प्रतिसाद नसल्याने फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
----------------------------------
खासगी वाहनांनी प्रवास
ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आपल्या शेतीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ते अन्यत्र जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे बस फेऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने आगाराने फेऱ्या बंद ठेवल्या आहेत. मात्र तरीही एखाद्याला काही कामानिमित्त बाहेर जायची गरज पडल्यास ऑटो किंवा अन्य वाहनाने त्यांना प्रवास करावा लागतो.
--------------------------
आमच्या गावापर्यंत बस येत नसल्याने आम्हाला तिरोडा येथून बसने पुढील प्रवास करावा लागतो. सध्या कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिकही बाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळेही बस फेऱ्या बंद असल्याचे दिसते. आता कोरोनाचा जोर कमी होत असल्याने परिस्थिती रूळावर येत आहे. त्यामुळे फेऱ्याही सुरू होतील.
- शुभम अटराहे (प्रवासी)
------------------------------
ग्रामीण भागातही कोरोनाचा जोर वाढला होता. त्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. त्यात आता शेतीची कामे सुरू असून नागरिकांना शेतीच्या कामातूनच वेळ मिळत नसल्याने ते बाहेर ये-जा करणे टाळत आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने नागरिकांची ये-जा सुरू झाल्यास बस फेऱ्याही सुरू होतील व त्याचा फायदा मिळेल.
लखन पटले (प्रवासी)
-------------------
एकूण बसेस- ८१
सध्या सुरू-५०
आगारातच उभ्या- ३१
एकूण कर्मचारी- ३१५
- चालक- १२९
वाहक- ९६
कामावर चालक - सर्वच
कामावर वाहक- सर्वच