शिकारीसाठी आला अन् पिंजऱ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:12 AM2017-01-12T00:12:31+5:302017-01-12T00:12:31+5:30
वनालगत असणाऱ्या गावांमध्ये वन्यप्राणी येण्याच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत.
कोहलगावात बिबट्याचा धुमाकूळ : दिवसभर दोन घरांत आश्रय, पाच कोंबड्या ठार
नवेगावबांध : वनालगत असणाऱ्या गावांमध्ये वन्यप्राणी येण्याच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. पण बुधवारी नवेगावबांधजवळच्या कोहलगाव या गावात पहाटे-पहाटे बिबट्याने एका घरात शिरून गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडविली. या बिबट्याने तब्बल दुपारी ४ वाजेपर्यंत एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन नागरिकांची तारांबळ उडविली. शेवटी वनविभागाच्या पथकाला त्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले.
बुधवारी पहाटेच्या सुमारास कोहलगाव येथील दादाराव साखरे यांच्या घरात एक बिबट्या कोंबड्यांची शिकार करण्यासाठी शिरला. त्यांच्या घरी असलेल्या पाच कोंबड्या त्याने ठार मारल्या व आतील खोलीत नेऊन ठेवल्या. सकाळी उठल्यानंतर साखरे हे कोंबड्या बघायला गेल्यानंतर त्या गायब झालेल्या दिसल्या. इकडे-तिकडे शोध घेतल्यानंतर आतील खोलीत मेलेल्या कोंबड्या व बिबट दिसला. त्यामुळे एकच आरडा-ओरड सुरू झाली. त्यामुळे बिबट तेथून पळाला व चुन्नीलाल टेंभुर्णे यांच्या बाथरुममध्ये घुसला. तेथूनही निसटून तो सकाळी आठ वाजताच्या सुमारास सुरेश शहारे यांच्या घरात शिरला. त्याने दिवसभर तिथे मुक्काम ठोकला. दरम्यान किशोर जांभुळकर यांची एक शेळी देखील त्याने जखमी केली.
सकाळी ९ वाजेच्या सुमारास वन्यजीव विभागाचे बचाव पथक आले. अथक प्रयत्न करुन देखील दिवसभर बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आले नाही. शेवटी दुपारी चार वाजताच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात शिरला आणि अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
सुदैवाने या धावपळीत कोणीही जखमी झाले नाही. सदर बिबट्याचे वय सुमारे साडेतीन वर्षे असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पाठक, ए.सी.एफ. गीता पवार, ए.सी.एफ. उदापुरे, वन्यजीव विभागाचे कर्मचारी, बचाव पथकाचे कर्मचारी, डॉ. दीपक मंदिकुंटावार, डॉ.बावणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)