पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

By नरेश रहिले | Published: August 25, 2024 06:40 PM2024-08-25T18:40:55+5:302024-08-25T18:41:07+5:30

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

came with a job appointment letter in the police force and got stuck | पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

गोंदिया : नोकरीचे आमिष देऊन कित्येकांना गंडा घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाच औरंगाबाद पोलिस दलात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला डुग्गीपार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२३) ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली आहे. विलास नारायण गणवीर (६५, रा. किन्ही-मोखे, ता. साकोली, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी डुग्गीपार येथील पोलिस हवालदार दीपक खोटेले यांना ग्राम खोडशिवनी रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती औरंगाबाद पोलिस दलात शिपाई या पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देणार आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविली व वरिष्ठांच्या निर्देशानुसार फिर्यादी वामन व्यंकटराव भुरे (रा. पालेवाडा) यांच्या मदतीने पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक गाठून परिसरात सापळा लावला. याप्रसंगी त्यांनी आरोपी विलास गणवीर याला ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्याच्यावर डुग्गीपार पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोळे, पोलिस हवालदार दीपक खोटेले, घनश्याम उईके, पोलिस नायक महेंद्र चौधरी, घनश्याम मुळे यांनी केली आहे.

बॅगमध्ये आढळून आले हे साहित्य
- आरोपी विलास गणवीर याची चौकशी करून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलिस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, औरंगाबाद पोलिस भरती उमेदवार प्रवेशपत्र, औरंगाबाद येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांचा शिक्का असलेले कागदपत्र, विद्यार्थ्यांचे मूळ टिसी, मार्कशिट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र आदी मिळून आले.

फसवणुकीचे ८ ते १० गुन्हे दाखल
- आरोपी विलास गणवीर याच्यावर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत ८ ते १० गुन्हे दाखल आहेत.

२८ पर्यंत पीसीआर
- आरोपी विलास गणवीर याला सडक-अर्जुनी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.२८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

भूलथापांना बळी पडू नका
- नोकरी लावून देण्याच्या नावावर फसवणूक संबंधात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन पैसे घेऊन भूलथापा देण्याऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. नोकरी लावून देण्याकरिता कुणी पैशांची मागणी केल्यास वा पैशांची मागणी करणाऱ्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भूलथापांना बळी पडू नका.
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया.

Web Title: came with a job appointment letter in the police force and got stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.