वन्यजीव विभागाने लावले शेंडा परिसरातील शेतात कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:08 PM2018-04-04T22:08:44+5:302018-04-04T22:08:44+5:30
शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोलयारी) : शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहेत. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तक्रार वनविभागाकडे वारंवार केली जाते. मात्र वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते.
यावर तोडगा काढण्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून येथील शेतकरी लेमनदास पाटील लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारा भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्यामध्ये वन्यप्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत.
येथील शेतकरी लिल्हारे यांची जवळच असलेल्या मोहघाटा येथे बारा एकर शेती आहे. त्यांच्या शेतात ऊस व धानाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्यांच्या शेतातील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच शेंडा, कोयलारी, कोहळीपार, प्रधानटोला, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवाणी येथील शेतकरी सुद्धा वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त आहेत.
अशातच वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून शेतमालाचे नुकसान कोणकोणत्या वन्य प्राण्यांमुळे होते, हे शोधण्यासाठी लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारे भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत. या कॅमेºयाच्या एक फर्लांग अंतरावरील परिसरात कोणताही प्राणी अडकल्यास त्याचा फोटो आपोआप कॅमेºयात टिपला जातो. या परिसरात रानहल्ले, रानडुक्कर, अस्वल, निलघोडे, सांबर, चितळ तसेच हरणाच्या कळपांचा वावर राहतो. उन्हाळ्याला सुरुवात होताच पाण्याच्या शोधात गावाकडे, शेताकडे धाव घेतात. शेतात लावलेल्या धानपिकाची हिरवळ व ऊस खावून तृष्णा भागवतात. मात्र अशातच शेतमालाचे मोठे नुकसान करतात. काही शेतकºयांना तर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रासून रात्रभर शेतमालाची राखण करावी लागते.
वन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जंगलाच्या चारही बाजूने काटेरी कुंपन केल्यास व पाण्यासाठी जंगलातच पाणवठे तयार केल्यास वन्य प्राणीही सुरक्षित राहतील व शेतमालाचे नुकसानही होणार नाही.