शिबिरातून प्रश्न मार्गी लावणार

By admin | Published: February 22, 2017 12:14 AM2017-02-22T00:14:07+5:302017-02-22T00:14:07+5:30

जनता जनार्दनाला शासनाच्या योजनांची माहिती उपलब्ध होत नाही. जनतेचे प्रश्न अनेक आहेत,

From the camp, the questions will be resolved | शिबिरातून प्रश्न मार्गी लावणार

शिबिरातून प्रश्न मार्गी लावणार

Next

बडोले : झाशीनगर योजनेचे पाणी महिनाभरात मिळणार
अर्जुनी-मोरगाव : जनता जनार्दनाला शासनाच्या योजनांची माहिती उपलब्ध होत नाही. जनतेचे प्रश्न अनेक आहेत, ते कसे मार्गी लावता येतील यादृष्टीने महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून महासमाधान शिबिराचे आयोजन करून ६३ हजार ४१ लाभार्थ्यांना या शिबिरातून लाभ दिला जात आहे. उर्वरीत प्रश्न याचप्रकारे मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
‘आपले शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित महासमाधान शिबिरात ते बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, माजी आ.दयाराम कापगते, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, पं.स.च्या उपसभापती आशा झिलपे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी व्ही.एम.परळीकर, कृऊबा समितीचे सभापती काशिम जमा कुरैशी, खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, जि.प.चे माजी सभापती प्रकाश गहाणे, केवळराम पुस्तोडे, जि.प.सदस्य गिरीश पालीवाल, तेजूकला गहाणे, मंदा कुंभरे, कमल पाऊलझगडे, शुध्दोधन शहारे मंचावर उपस्थित होते.
ना.बडोले म्हणाले, महासमाधान शिबिराच्या माध्यमातून ४० हजार लाभार्थ्याना लाभ देण्याचे निर्धारीत केले होते. शासनाच्या ५० योजनांद्वारे ६३ हजार ४१ लाभार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. झाशीनगरच्या पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले. येत्या महिनाभरात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. जुनेवाणी तलावाच्या सिंचनाचा प्रश्न रखडला आहे. हा प्रश्न सुध्दा मार्गी लावू असे त्यांनी सांगितले. भारनियमन कमी करून शेतकऱ्यांना सिंचनाच्या लाभ मिळावा यासाठी २४ तास कशी वीज देता येईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केंद्रशासनाचे २०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. २०१९ पर्यंत सर्वांना घरे देता येईल काय, यादृष्टीने नियोजन करून ते पूर्णत्वास येतील अशी आशा व्यक्त केली. पूर्व विदर्भाच्या ५ जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी ११ हजार विहिरीचे उद्दिष्ट दिले होते. गोंदिया जिल्ह्यात २ हजार विहिरीचे उद्दिष्ट पूर्णत्वास येत आहे. या परिसरात साखर कारखाना तयार करण्याचा माणस त्यांनी व्यक्त केला. शासनाकडे सूत गिरणीचा प्रस्ताव दिला आहे. तो मंजूर होईल अशी आशा बाळगली. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३० संस्थाच्या माध्यमातून कौशल्य विकासाद्वारे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसात कार्यक्रमाची आखणी केली जाईल असे त्यांनी सांगितले.
जनधन योजना, मुद्रा बँक योजना, सुशासन, वृक्षारोपण, उज्वला गॅस व स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. स्वच्छ भारत अभियानात गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात पहिला राहील त्यादृष्टीने प्रशासन कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सामूहिक वन हक्क दावे व वनजमीनीचे पट्टे देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षकांना जिल्हास्तरीय बैठक घेण्याचे निर्देश दिले. गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या भरपूर आहे. या तलावांचे खोलीकरण करण्याचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यात रस्ते, पर्यटन, तलाव, सिंचन व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यांनी सबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. रस्त्याची कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी सरस्वती विद्यालय, नवोदय विद्यालय, तिबेटीयन व आदिवासी आश्रम शाळेतर्फे नृत्य सादर करण्यात आले. महासमाधान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्कृष्ट सहयोग देणाऱ्या कर्मचारी, सरपंचांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. संचालन डॉ.प्रा.दिलीप काकडे, प्रास्ताविक तहसीलदार डी.सी.बाम्बोर्डे यांनी तर खंडविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: From the camp, the questions will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.