गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू
By admin | Published: August 26, 2014 12:03 AM2014-08-26T00:03:25+5:302014-08-26T00:03:25+5:30
शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा
पालिकेला जाग : मामा चौक व शास्त्री वॉर्डात टाकले मासे
गोंदिया : शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा हा प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. अखेर लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिकेने सोमवारपासून (दि.२५) शहरात गप्पी मासे टोकण्याची मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी शहरातील मामा चौक व शास्त्री वॉर्डात मासे टाकण्यात आली.
जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. यापासून गोंदिया शहरसुद्धा सुटलेले नाही. शहरातही डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळून येत आहेत. डेंग्यू, मलेरिया व फायलेरिया हे डासजन्य आजार असून यातील डेंग्यू व मलेरिया हे जीवघेणे आजार आहेत. विशेष म्हणजे यामुळे जिल्ह्यात कित्येकांचा जीवही गेला आहे. या आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी डासांचा नायनाट करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात जिल्हा हिवताप विभाग नजर ठेवते तर शहरात मात्र नगर पालिकेची जबाबदारी असते. त्यातही डासांची उत्पत्ती थांबविण्यावर योग्य तोडगा म्हणजे गप्पी मासे आहेत. हिवताप विभागाकडून पालिकेला गप्पी मासे दिली जातात. पालिकेला हे गप्पी मासे पाण्याच्या डबक्यांत सोडावी लागतात. दरवर्षी पालिका यासाठी विशेष मोहीम राबविते. त्यानुसार, यंदाही हिवताप विभागाने पालिकेला गप्पी मासे उपलब्ध करवून दिली. पालिकेकडे यासाठी विशेष गप्पी मासे पैदास केंद्रही आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गप्पी मासे आहेत.
यंदा मात्र गंभीर स्थिती निर्माण झालेली असतानाही पालिकेकडून अद्याप गप्पी मासे सोडण्यात आलेली नाहीत. यावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिकेच्या स्वच्छता विभागाने सोमवारपासून (दि.२५) शहरात गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेतली. यांतर्गत शहरातील मामा चौक व शास्त्री वॉर्डात असलेल्या पाण्याच्या डबक्यांत पालिकेचे आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या व मुकेश तिवारी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत गप्पी मासे सोडली. या मोहीमेंतर्गत आता शहरातील प्रत्येक वॉर्डातील पाण्याच्या डबक्यांत गप्पी मासे सोडली जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)