कालव्यांचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: March 3, 2016 01:45 AM2016-03-03T01:45:39+5:302016-03-03T01:45:39+5:30
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
कालव्यावर रस्ते, घर बांधकाम : सिंचन सुविधा वाढविण्यात अपयश
यशवंत मानकर आमगाव
बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कालव्यांची दुरुस्ती, सिंचनवाढ याकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी मिळणारी सिंचन सुविधा नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामाकरिता दिला आहे. परंतु सिंचनातील महत्त्वाचे कालवे योग्य व्यवस्थापनातून बाद झाले आहेत. अनेक भागातून जाणारे कालवे दुरुस्ती व बांधकामाअभावी फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचे अपव्यय वाढले आहे. कालव्यांमधील स्वच्छता व देखरेख यासाठी शासनाने नियमित कर्तव्य ठरवून दिलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कालव्यांची विल्हेवाट लावली जात आहे.
बाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागांतर्गत पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर या धरणांसह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवून धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरिता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे सिंचन सुविधेपासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागत आहे.
आमगाव, बनगाव व रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढले आहे. पाण्याचे विचरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कालव्यांच्या भूमीलगत प्रतिबंधक अशी उपाययोजना असल्याने त्याची सुरक्षितता विभागावर आहे. परंतु विभागाकडूनच या कालव्यावर पक्के अतिक्रमण करण्यासाठी पाठबळ दिल्याने कालव्यांवर पक्के बांधकाम करुन नागरिकांनी उपयोगात आणले आहे. त्यामुळे कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपविभाग आमगाव अंतर्गत येणारे सिंचन धरणे यातील सिंचन वाढीचे प्रयत्न विभागाकडून झालेच नाही. त्यामुळे सिंचनातील पाण्याची वाढ करण्यात विभागाला अपयश आले. दरवर्षी शेतकऱ्यांना शेतपिकासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता व मागणी यात तफावत निर्माण होत असल्याने शेतकरी पिकांपासून वंचित होत आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा विभागाला सिंचन सुविधा वाढविण्याची मागणी केली. परंतु या प्रकाराला विभागाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पाण्याअभावी हातातील पिके गमावण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य व्हावे लागले.
आमगाव उपविभागात शासनाने विविध उपाययोजना अंतर्गत निधी उपलब्ध करुन सिंचन सुविधा तत्पर करण्यासाठी योजना कार्यान्वित केली. परंतु याचा उपयोग सुविधांसाठी झालेच नसल्याचे निदर्शनात येते. कालव्यांची दुरवस्था, अपुरे सिंचन प्रकल्प यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. शासनाने या विभागाला किती निधी दिला याचा शोध घेऊन तो विभागाने कुठे उपयोगात आणला याची आता चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
विभागाच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे रबी पिकासाठी टाकलेले बियाणे जमिनीत मुरले. तर रबी पिकापासून शेतकऱ्याला वंचित व्हावे लागेल.