कालव्यांचे अस्तित्व धोक्यात
By admin | Published: January 17, 2015 01:50 AM2015-01-17T01:50:21+5:302015-01-17T01:50:21+5:30
शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली.
आमगाव : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या कालव्याचे योग्य व्यवस्थापनच नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच त्यावर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आमगाव तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
तालुक्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या माध्यमातून धानासह कडधान्य, गळीतधान्य व भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्न घेत असतात. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोयींचा पुरेपूर वापर झाल्यास त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. परंतु या कालव्यांचे व्यवस्थापन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे धोक्यात आले आहे.
आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी कालव्यांच्या माध्यमाने पुरविले जाते. तालुक्यातील २२३२६ हेक्टर खरीप, तर रबी ३४३० हेक्टर व बागायती ९१९३ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राला लघुप्रकल्प व इतर सिंचन सुविधांच्या माध्यमाने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. कालव्यांचे जाळे शेतशिवारातून ते शहरातील मुख्य भागामधून टाकण्यात आले आहेत. या कालव्यांच्या लगत लोकवस्तीही निर्माण झाली आहे. परंतु लोकवस्ती निर्माण होताना कालव्यांचे व्यवस्थापन बघणारा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग याबाबत पूर्णत: बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यक्तींनी धरण कालव्यांची जमीन बळावल्याचा प्रयत्न केला. यातूनच शहरी भागातून कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले.
अनेक व्यक्तींनी कालव्यांवर पक्के रस्ते बनविले. काही कालव्यांवरच पक्क्या इमारती बांधकामाचे नियोजन केले. कालव्यांची जागा मुख्य केंद्रातून मोजण्यात येते. मोठे कालवे हे ८० मिटर रुंदीचे तर लहान कालवे २० मिटर रुंदीचे आहेत. शासनाने भूसंपादन करताना या जागेची रितसर लेखणी केली.
परंतु व्यवस्थापन बघणाऱ्या विभागाने या कालव्यांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कालवे भविष्यात शोधावे लागण्याची पाळी येणार आहे. (शहर प्रतिनिधी)