दोन शिक्षिकांची नियमबाह्य नियुक्ती केली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:11+5:302021-09-18T04:32:11+5:30
गोंदिया : तालुक्यातील शिवनी गात्रा येथील अशोक शिक्षण संस्थाद्वारा संचालित संत कबीर हायस्कूलमध्ये नियुक्ती केलेल्या दोन शिक्षिकांची व्यक्तिगत मान्यता ...
गोंदिया : तालुक्यातील शिवनी गात्रा येथील अशोक शिक्षण संस्थाद्वारा संचालित संत कबीर हायस्कूलमध्ये नियुक्ती केलेल्या दोन शिक्षिकांची व्यक्तिगत मान्यता नागपूर शिक्षण उपसंचालकांनी रद्द केली आहे.
संत कबीर हायस्कूल शिक्षिका वैशाली मोहनलाल रोकडे व छाया दादुराम बडोले या दोन शिक्षिकांची नियमबाह्य मान्यता रद्द करण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांकडे १७ मार्च २०२१ रोयी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. संस्थेचे सचिव कमल बोंबार्डे यांच्यानुसार संत कबीर हायस्कूल येथे शिक्षिका वैशाली रोकडे यांना १६ जानेवारी २०१७ व छाया बडोले यांना १ फेब्रुवारी रोजी नियुक्ती देण्यात आली होती. या दोन्ही शिक्षिकांच्या नियुक्तीला तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती. दरम्यान, या प्रकरणावर शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत मुख्याध्यापक व शिक्षिका आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या बयाणात बरीच तफावत आढळली. या दोन्ही शिक्षिकांना व्यक्तिगत मान्यता देताना दिलेल्या कागदपत्रांमध्येसुद्धा त्रुटी आढळल्या. शिक्षक भरतीसाठी काढलेल्या जाहिरातीत प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला नाही. प्रस्तावावर संस्था सचिव व शाळा समिती पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाही. शासन निर्णय ४ एप्रिल २०१८ व २४ ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या तरतुदीनुसार छाया बडोले यांची नियुक्ती जनरलमधून करण्यात आली आहे. तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी मंजुरीसंदर्भात दिलेले स्पष्टीकरणसुद्धा समाधानकारक नव्हते. शासनाच्या दिशा निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी दोन्ही शिक्षिकांची नियुक्ती रद्द केली आहे. तसेच अशाच प्रकारचे नियुक्ती आदेश दिल्याप्रकरणी पोलिसातसुद्धा तक्रार करण्यात आली आहे.