उमेदवारांचे देवापुढे लोटांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:30 PM2019-03-30T23:30:53+5:302019-03-30T23:31:22+5:30
जेमतेम १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असून उमेदवार मतदार राजाला खूश करण्यासाठी गल्लो गल्ली फिरत आहेत. मात्र एवढ्यावरच ते थांबले नसून विजय आपलाच व्हावा यासाठी उमेदवार देवापुढे लोटांगण घालत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
्नेगोंदिया : जेमतेम १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असून उमेदवार मतदार राजाला खूश करण्यासाठी गल्लो गल्ली फिरत आहेत. मात्र एवढ्यावरच ते थांबले नसून विजय आपलाच व्हावा यासाठी उमेदवार देवापुढे लोटांगण घालत आहेत. शहरातील प्रसिद्ध मंदिरांत दररोज उमेदवार देवाच्या दर्शनाला येवून विजयासाठी साकडे घालत आहेत. तर याच मंदिरांत नागरिकांनाही उमेदवारांचे दर्शन घडत आहे.
लोकसभेची खुर्ची म्हणजे ‘राजयोग’.यासाठी येत्या ११ तारखेला निवडणूक होत आहे. त्यामुळे आता प्रत्येकच पक्ष उमेदवारांकडून आपापल्या परीने प्रचाराला जोर दिला जात आहे. दिवस कमी व क्षेत्र मोठे अशी परिस्थिती गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांची झाली. त्यात आता उरलेल्या दिवसांत दोन्ही जिल्ह्यातील मतदारांपर्यत पोहचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते दिवसरात्र एक करीत आहेत.
मतदार राजाला खूश करून त्यांचे मत मिळवून घेण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू आहे. पक्ष व कार्यकर्तेही यात कसर सोडत नसून जास्तीत जास्त जनसंपर्कावर जोर देत आहे.
विजयासाठी हा सर्व खटाटोप केला जात असला तरी वर बसलेल्या ‘बिग बॉस’च्या मर्जीशिवाय काहीच होत नसल्याने देवावर श्रद्धा ठेवीत उमेदवार देवापुढे लोटांगण घालतांना दिसत आहे.
जिल्ह्यात काही मंदिर प्रख्यात असून या मंदिरांत आल्यादिवशी उमेदवार हजेरी लावून देवाला विजयासाठी साकडे घालत आहेत.
एकदाचा विजय होऊ दे हीच मागणी करीत उमेदवार प्रचाराच्या धावपळीत मात्र वाटेत पडणाऱ्या प्रत्येकच देवस्थानात हजेरी लावूनच पुढे जात असल्याचे बघावयास मिळत आहे.
मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे वचन
देवी देवता म्हटले की, सर्वांच्याच भावना जुळलेल्या असतात. अशात कुणी देवीदेवतांचे देवस्थान किंवा कोणत्याही धर्मातील आद्य देवतांच्या स्थानांचा जिर्णोद्धार करणार असे म्हटल्यास सर्वांनाच आनंद होतो. धर्मप्रेमी नागरिकांची नेमकी हीच नस दाबत उमेदवार अशांना देवस्थानांच्या जिर्णोद्धाराचे वचनही देतात. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या उमेदवारांकडून नागरिकांच्या भावना लक्षात घेत काही ना काही वचन दिले जात असल्याचे दिसून येते.