होमगार्ड नोंदणीतून उमेदवारांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:28 PM2018-04-11T22:28:03+5:302018-04-11T22:28:03+5:30
जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. मात्र या सदस्य नोंदणी दरम्यान अंशकालीन काम करणाऱ्या उमेदवारांना आरक्षण न देता डावल्याचा आरोप अर्जुनी मोरगाव तालुका अंशकालीन बेरोजगार संघटनेचे संघटक चिचोली येथील प्रल्हाद पाटणकर यांनी केला आहे.
अंशकालीन काम करणाºया उमेदवारांना तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस भरतीसह इतर विभागतून कर्मचाºयांची भरती प्रक्रियेमध्ये अंशकालीन उमेदवारांना आरक्षण देवून सेवेत सामावून घेतले जाते. मात्र ७ व ८ एप्रिलला जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणी दरम्यान अंशकालीन उमेदवारांना डावलून उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे होमगार्ड नोंदणी प्रक्रियेतून अंशकालीन उमेदवारांचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. संबंधीत विभागाची अंशकालीन उमेदवारांविषयी असलेली उदासीनता पुढे आली आहे. सतत तीन वर्ष तुटपुंज्या ३०० रुपये मानधनावर शासकीय कामे करुन शासनास मदत केली. शासन मागे पुढे आपल्याला आरक्षण देवून नोकरीत सामावून घेईल या आशेवर अंशकालीन उमेदवार जगत आहेत. कर्मचारी प्रवेश प्रक्रियेमधून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारांमध्ये शासनाप्रती रोष व्याप्त आहे. कोणत्याही शासकीय नोकर भरती प्रक्रियेमध्ये अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी अंशकालीन बेरोजगार संघटक पाटणकर यांनी केली आहे.