कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:30 AM2021-04-01T04:30:01+5:302021-04-01T04:30:01+5:30
गोंदिया : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ...
गोंदिया : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.
बुधवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम
देशपांडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये व माविमचे समन्वय अधिकारी सतीश मार्कंड उपस्थित होते.
........
१५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या भागात विशेष मोहीम
या बैठकीत आरटीपीसीआर व रॅट तपासणी, कन्टेन्मेंट झोन घोषित करणे, ज्या भागात १५ पेक्षा जास्त नागरिक कोरोनाबाधित असतील, अशा भागात विशेष मोहीम राबवून कोरोनाची तपासणी करणे, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांची माहिती घेणे व नियंत्रण ठेवणे, गर्दीचे प्रमाण कमी करणे, ग्रामीण भागात आरोग्य व महसूल यंत्रणा कार्यान्वित करणे, हॉटस्पॉट निश्चित करणे, खासगी व शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांची माहिती सांकेतिक स्थळावर प्रसिध्द करणे, कोविड रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.