मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:32+5:30
जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील धरण, जलाशये, तलाव व नद्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत अचानक पाऊस पडल्यास जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका नाकारता येत नाही. येणाऱ्या पुराच्या आपत्तीची तिव्रता कमी करण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात गुरूवारी (दि.११) आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. बलकवडे यांनी, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी त्याचे सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे.
जलसंपदा व महसूल विभागांनी योग्य समन्वय साधून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतींची मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. पूर परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी त्वरीत प्रतिसाद देणे, संबंधीत माहिती विचारु न दक्षता घेऊन शोध व बचावकार्य करण्याचे निर्देश दिले.
तसेच पूर परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी हेलीपॅड बांधण्या संबंधात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तसेच संबंधित तहसीलदारांनी समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील पर्यंटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेताना किंवा गर्दी करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कार्यवाही करावी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्हयातील तालुका, नगर परिषद, नगर पंचायत, प्रभाग, वॉर्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करावी. जेणेकरु न पूर परिस्थीतीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पूर परिस्थीतीत जिवीत व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे सांगीतले.
तसेच सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करण्याचे व पूर प्रवण ८७ गावांचा सुक्ष्म आराखडा तयार करुन मान्सून कालावधीत सुरक्षित स्थळ (निवारा) चिन्हांकित करुन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी या वेळी संबंधित विभागाकडून तयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. सभेला उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, गंगाधर तळपदे, शिल्पा सोनाले, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसीलदार राजेश भांडारकर, विनोद मेश्राम, सी.जी.पित्तुलवार, प्रशांत घोरुडे, डी.एस.भोयर, विजय बोरूडे, अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसलीदार राजेश वाकचौरे, आर.एम खोकले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बॅरिकेट्स, औषध व फलक व्यवस्था
जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंऱ्यांना धरणाचे पाणी सोडण्यापुर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलिस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूर प्रवण सर्व ८७ गावांत धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला तारांवरील झाडांच्या फांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याच्या ठिकाणी रेडियमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची माहिती सर्व ग्रामपंचायतीत लावण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतींना नाले, नालींची स्वच्छता करुन जीर्ण इमारत मालकास नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले.