निर्बंधासह काेरोना ही होतोय शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:54+5:302021-06-09T04:36:54+5:30
गोंदिया : कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असल्याने सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला. निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. ...
गोंदिया : कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असल्याने सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला. निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. त्यातच आता कोरोना बाधितांची संख्या सुध्दा कमी होत आहे. त्यामुळेच निर्बंध शिथिल होत असतानाच आता कोरोना संसर्गसुध्दा कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
सोमवारी (दि.७) जिल्ह्यात १२ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मागील चार महिन्यांनंतर प्रथमच सर्वात कमी ५ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमीदेखील कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत असल्याचे चित्र आहे. मात्र संसर्ग शिथिल होत असला तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १७०८७२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १४५९१५ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत १६६२९९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले असून त्यापैकी १४५४११ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०९४७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३९९२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३३३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
...........
८७४ नमुन्यांची चाचणी ५ पाॅझिटिव्ह
काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी एकूण ८७४ जणांची चाचणी करण्यात आली. यात २६२ जणांची आरटीपीसीआर तर ६१२ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ५ जण पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५७ टक्के आहे.
..................
२ लाख ७७ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच शासनाने आता लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७७ हजार १९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात २ लाख १२ हजार २१२ नागरिकांना पहिला तर ६४९८४ नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.