दागिन्यांनी भरलेली बॅग केली परत प्रवाशी महिलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:43+5:302021-07-16T04:20:43+5:30

गोंदिया : रेल्वे स्थानकावर गस्ती दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाला १ लाख ४ हजार ६०० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली ...

Carried a bag full of jewelry back to the traveling woman | दागिन्यांनी भरलेली बॅग केली परत प्रवाशी महिलेला

दागिन्यांनी भरलेली बॅग केली परत प्रवाशी महिलेला

Next

गोंदिया : रेल्वे स्थानकावर गस्ती दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाला १ लाख ४ हजार ६०० रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग मिळाली. योग्य कार्यवाही करून व खऱ्या मालकाचा शोध घेऊन रेल्वे सुरक्षा दलाने ती बॅग प्रवाशी महिलेला परत केली. ही घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक उषा बिसेन, आरक्षक नासिर खान, प्रधान आरक्षक एन.ई.नगराळे, एस. के. नेवारे व आरक्षक डी. के. लिल्हारे हे १४ जुलै रोजी रेल्वे स्थानकावर गस्तीवर होते. दरम्यान त्यांना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक ४ वर आरएमएस ऑफिसजवळ गुलाबी रंगाचे एक लेडीज हँडबॅग बेवारस पडून असल्याचे आढळले. याबाबत त्यांनी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना विचारपूस केली. परंतु सर्वांनी बॅग आपली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष व्हिडिओग्राफी करीत बॅग उघडण्यात आली. त्यात १ सोन्याचे मंगळसूत्र, १ सोन्याची चेन, १ सोन्याची नथ, २ जोडी (चार नग) बालकाच्या हाताचे चांदीचेकडे, चांदीचा किल्ल्यांचा १ गुच्छा, २ नग चांदीचे पायाचे अंगठ्या, २ जोडी आर्टिफिशियल कानाचे झुमके, १ नग आर्टिफिशियल कंठहार, २ नग आर्टिफिशियल साडी पिन, १ जोडी आर्टिफिशियल कानाची बाली, १ जोडी आर्टिफिशियल लटकन असा एकूण १ लाख ४ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज आढळला. या बॅगमध्ये महागडे दागिने बघून त्वरित रेल्वे सुरक्षा दलाचे सीसीटीव्ही फुटेज शोधले व त्या आधारावर बॅगच्या खऱ्या मालकाचा शोध घेण्यात आला.

.............

गाडीत चढल्यावर आले लक्षात

मनीष विजय खोब्रागडे रा. टेमनी, बटाना (ता. जि. गोंदिया) हे आपली पत्नी निकिता व मुलासह रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात हजर झाले. त्यांनी सांगितले की, ते इतवारी-दुर्ग लोकल गाडीने गोंदियावरून राजनांदगावला जाण्यासाठी फलाट क्रमांक ४ वर सामानांसह बसून गाडीची वाट पाहत होते. पत्नी आपल्या मुलाला दूध पाजत होती. दरम्यान गाडी आली व ते घाईगडबडीत इतर सामान घेऊन गाडीत चढले. मात्र पण बॅग फलाटावरच विसरले. दरम्यान गाडी गोंदियावरून रवाना झाली होती. त्यांनी गाडीत आपल्या सामानांची तपासणी केल्यावर बॅग नसल्याचे व फलाटवर विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. आमगाव स्थानकात गाडी थांबताच तेथे उतरुन यानंतर ते गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात उपस्थित झाले. उपस्थित पंचांसमक्ष १ लाख ४ हजार ६०० रुपयांच्या दागिन्यांच्या ऐवजाने भरलेली बॅग योग्य कार्यवाही करून त्यांच्या सुपूर्द करण्यात आली.

Web Title: Carried a bag full of jewelry back to the traveling woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.