एसटीचे वाहक-चालक ठरविणार बस कुठे जाणार, कुठे थांबणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:06+5:30
आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी कोठे चालवायची, कोठे थांबवायची, तिचा वेळ आदींबाबत प्रस्ताव मांडतील. यावर आगारप्रमुख व अन्य कर्मचारी आपसांत चर्चा करून एकमताने निर्णय घेतील.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्व काही अस्तव्यस्त झाले आहे. यात कित्येकांचे नुकसान झाले असून, कित्येकांच्या हातचा रोजगारही हिरावला गेला आहे. यापासून राज्य रस्ते परिवहन महामंडळही सुटले नसून त्यांना चांगलाच फटका बसला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही विसरता येत नसून नागरिकांनी आता प्रवास टाळणेच पसंत केल्याचे दिसते.
यामुळे आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी कोठे चालवायची, कोठे थांबवायची, तिचा वेळ आदींबाबत प्रस्ताव मांडतील. यावर आगारप्रमुख व अन्य कर्मचारी आपसांत चर्चा करून एकमताने निर्णय घेतील.
एकंदर चालक-वाहकांचा अनुभव आता महामंडळ तोट्यातून बाहेर निघण्यासाठी वापरून घेतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रवाशीे संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध प्रयोग राबविले जात आहे.
मार्ग, थांबेही ठरविणार
- एखाद्या मार्गाने जाणारी एसटी थांब्याशिवाय थांबत नाही व त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. याशिवाय प्रवाशांच्या सोयीनुसार एसटीची वेळ नाही किंवा या मार्गावर एसटी येत नाही, अशा तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आता चालक-वाहक अशा मार्गांवर एसटी चालवायची, प्रवाशांच्या वेळेनुसार एसटीची वेळ बदलायची, एखाद्या ठिकाणी प्रवासी बघून प्रतिसाद बघून थांबा द्यायचा या सर्व सूचना मांडतील व त्यावरून आता निर्णय घेतले जातील.
चालक-वाहकांच्या सूचनांसाठी रजिस्टर
- चालक-वाहक एसटी घेऊन थेट जनतेत जातात व यामुळे त्यांचा शेकडो नागरिकांशी संपर्क येतो. अशात नागरिकांच्या प्रतिक्रिया व अपेक्षा त्यांना कळतात. यातून आता चालक-वाहक आगार प्रमुखांना याबाबत कळवतील व एसटी कोठे थांबवायची, कोठे चालवायची, वेळेत काही बदल करायचा आदींबाबत प्रस्ताव मांडतील. या सर्वाची नोंद करून घेण्यासाठी एक रजिस्टर तयार केले जाणार आहे. त्यामध्ये चालक-वाहकांनी दिलेल्या सूचनांची नोंद करून ठेवली जाईल.
चालक-वाहकांच्या सूचनांचे स्वागत
एसटीला घेऊन चालक-वाहक थेट जनतेत जातात व यामुळे त्यांना जनतेच्या काय प्रतिक्रिया व अपेक्षा आहेत हे कळते. याचाच फायदा महामंडळ घेणार असून, चालक-वाहकांच्या सूचनांचे स्वागत आहे.
- संजना पटले,
आगारप्रमुख, गोंदिया