नोकरीसाठी अनुकंपाधारकांचे सीईओंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:30 PM2018-03-01T22:30:05+5:302018-03-01T22:30:05+5:30
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
आमगाव : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.
मागील कित्येक वर्षापासून अनुकंपासंबंधी भरती झाली नाही. त्यामुळे लाभार्थी आपली वयोमर्यादा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहचले आहेत. घरातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. शासनाकडून मृत कर्मचाºयांच्या परिवारातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय असून सुद्धा केवळ गोंदिया जि. प. च्या उदासीन कारभारामुळे अनुकंपा लाभार्थ्यांना वेळोवेळी उपेक्षा केली जात आहे. शासन निर्णय असून सुद्धा अनुकंपा धारकांवर एवढा अन्याय का? शासकीय सेवेत कार्यरत असताना कोणत्याही कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास सहा महिन्याच्या आत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समावेश करण्याचा नियम आहे. त्यामुळे या नियमाची अमलबजावणी करुन अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावी. अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी यांनी अनुकंपा हा विषय महत्वाचा असून येत्या मार्च किंवा एप्रिल २०१८ मध्ये सरसकट भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. शिष्टमंडळात संजय हत्तीमारे, संज़य शहारे, श्रीकांत बडोले, योगेश पटले, अभय पालेवार, चंद्रकला ईरसरावत, ज्योती पटले यांचा समावेश होता.