आरोग्य विभागाचा गाडा प्रभारींच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:48+5:302021-08-21T04:33:48+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोना तसेच मलेरिया व डेंग्यूच्या दहशतीत सर्वच वावरत असताना जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब म्हणजे येथील जिल्हा ...
कपिल केकत
गोंदिया : कोरोना तसेच मलेरिया व डेंग्यूच्या दहशतीत सर्वच वावरत असताना जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब म्हणजे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकाऱ्यांचे पद मागील तीन-चार वर्षांपासून प्रभारींच्या भरवशावर चालत आहे. अशा या गंभीर परिस्थितीतही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला घेऊन शासन तसेच येथील लोकप्रतिनिधी किती गंभीर आहेत हे दिसून येते.
मागील वर्षभरापासून अवघ्या देशात कोरोनाने कहर केला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार पार झाली असून, ७०० हून अधिक नागरिकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. पहिल्या लाटेत कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच दुसऱ्या लाटेने मात्र कहरच केला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थेचे पितळही उघडे पडले. नागरिकांना बेड, ऑक्सिजन, औषध व इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागली व यातच शेकडोंचा जीव गेला. त्यानंतरही कोरोनाचा विळखा अजूनही सुटलेला नाही. त्यात आता डेंग्यू, मलेरिया व झिकाने गोंधळ घातला असून डेंग्यू व मलेरिया पाय पसरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात मलेरियाने एकाचा जीवही गेला असल्याने जिल्हावासीय दहशतीत वावरत आहेत. एवढ्या कठीण वेळीही जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकाऱ्यांचे पद प्रभारींच्या भरवशावर आहे. यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद मागील सुमारे २ वर्षांपासून तर हिवताप अधिकाऱ्यांचे पद मागील सुमारे ४ वर्षांपासून प्रभारींवरच आहे.
-----------------------------
नशीब, अधिष्ठाता व शल्यचिकित्सक कायम
आरोग्य विभागाचा गाडा प्रभारींच्या भरवशावर असतानाच अधिष्ठाता व शल्यचिकित्सक मात्र कायम आहेत, ही नशिबाची बाब आहे. कोरोना काळात वैद्यकीय महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अशात अधिष्ठाता कायम असल्यामुळे त्याचा वेगळाच फरक पडतो, यात शंका नाही. मात्र आता जिल्हा आरोग्य अधिकारी व हिवताप अधिकारी कधी लाभतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.