१२० विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक; अखेर तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:27 AM2022-09-27T11:27:52+5:302022-09-27T11:34:03+5:30
मजितपूर आश्रमशाळेचे प्रकरण : चौकशीला झाली सुरुवात
गोंदिया : मजितपूर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या १२० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या तीन शिक्षकांवर रविवारी गुन्हा दाखल केला.
मजितपूर येथील आश्रमशाळेतील १२० विद्यार्थ्यांना कोयलारी (ता. तिरोडा) येथील आश्रमशाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता ट्रकने नेले. क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर मजितपूर आश्रमशाळेच्या शिक्षकांनी व ट्रकचालकाने त्या ट्रकवरून दोन्ही बाजूने ताडपत्री बांधून ट्रकच्या डाल्यात बसवून कोयलारी मजितपूर आश्रमशाळेत आणत होते. काेंबून असलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने १० ते १२ विद्यार्थी बेशुद्ध झाले. यात ११ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. हा सर्व प्रकार संतापदायक आहे. याप्रकरणी महेशराव पुरणलाल उईके (४५, रा. गंगाझरी) यांच्या बयाणावरून गंगाझारी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०८, ३४, सहकलम ७५ बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, कलम १०८, १७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चांदेवार करीत आहेत.
स्वतंत्र चौकशी हाेणार
१२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबून वाहतूक केल्याप्रकरणाची आदिवासी विकास विभाग व शासनानेसुद्धा गांभीर्याने दखल घेतली आहे. आदिवासी विकास विभागानेसुद्धा त्यांच्या स्तरावर चौकशीला सुरुवात केली आहे. याचा अहवाल दोन-तीन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे.