टाईल्स फुटीचे प्रकरण एनआरएचएमला भोवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:30+5:302021-08-14T04:34:30+5:30
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील प्रसूती महिला दाखल करण्यात येणाऱ्या वाॅर्डातील भिंतीच्या टाईल्स कोसळून वॉर्डात दाखल असलेली ...
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील प्रसूती महिला दाखल करण्यात येणाऱ्या वाॅर्डातील भिंतीच्या टाईल्स कोसळून वॉर्डात दाखल असलेली प्रसूत महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ११) घडली. यामुळे या वाॅर्डात दाखल रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
येथील एकमेव बाई गंगाबाई महिला रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण झाली असल्याने याच रुग्णालयाच्या आवारात चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) नवीन इमारत तयार करण्यात आली. या इमारतीत प्रसूतीनंतर महिलांना दाखल केले जाते. तसेच याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर नवजात शिशुंचे कक्ष आहे. या इमारतीच्या बांधकामाला चारच वर्षे झाली आहेत. मात्र चारच वर्षांत इमारतीचे बांधकाम खचत असल्याने इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.११) याच इमारतीतील प्रसूती महिलांच्या वाॅर्डातील भिंतीला लावलेल्या तीन ते चार टाईल्स अचानक कोसळल्याने एक प्रसूत महिला जखमी झाली; तर तिचे नवजात बाळ यातून थोडक्यात बचावले. या प्रकारामुळे या वाॅर्डात दाखल असलेल्या प्रसूत महिला आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्हि.पी. रुखमोडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच चौकशी समितीसुध्दा नेमली. मात्र याची आता जिल्हाधिकाऱ्यांनीसुध्दा गांभीर्याने दखल घेतली असून, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश एनआरआरएचएम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच चार वर्षांतच बांधकाम खचून लागल्याने इमारत बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि एनआरएचएम संबंधित इमारत बांधकामाची जबाबदारी असणाऱ्यांची सुध्दा चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण आता त्यांना चांगलेच शेकण्याची शक्यता आहे.
................
नव्यापेक्षा जुनीच बरी!
बाई गंगाबाई महिला रुग्णालयात चार वर्षांपूर्वीच बांधकाम केलेल्या इमारतीची हालत खस्ता होत चालली आहे. बांधकामाच्या गुणवत्तेवरसुध्दा प्रश्नचिन्ह आहे. तर याच रुग्णालयाची १९३९ मध्ये बांधकाम केलेली इमारत सुस्थितीत आहे. या इमारतीतून अजूनही कामकाज सुरू आहे. त्यामुळे नव्यापेक्षा जुनी बरी! अशीच चर्चा येथे कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये आहे.