कमी मनुष्य बळातही मार्गी लावली जात आहे प्रकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:27 AM2021-02-12T04:27:26+5:302021-02-12T04:27:26+5:30
गोंदिया : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रकरणे दाखल ...
गोंदिया : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रकरणे दाखल केली जातात. मागील दोन महिने या समितीवर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रचंड व्याप वाढला होता. त्यामुळे हे कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवून ही सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विभागात आधीच कमी मनुष्यबळ मंजूर आहे. त्यातच या विभागात सहा ते सात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पण या स्थिती सुध्दा प्रकरणे प्रलंबित न ठेवता ती त्वरीत मार्गी लावली जात असल्याने प्रलंबित प्रकरणाची संख्या फार कमी आहे. येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे दररोज शंभराहून अधिक प्रकरणे दाखल केली जातात. तर दररोज ६० ते प्रकरणे मार्गी लावली जातात. तर महिन्याकाठी १२०० प्रकरणे दाखल होतात. सध्या शाळा महाविद्यालये सुरु होत असल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे या विभागात सध्या कामासाठी विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी वाढली आहे.
.......
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे साधारण रोज दाखल होणारी प्रकरणे - १००
एका महिन्यात दाखल प्रकरणे -१२००
रोज निकाली निघणारी प्रकरणे -६० ते ७०
प्रलंबित प्रकरणे - २००
......
कमी पदे मंजूर असल्याने अडचण
जिल्हा जात पडताळणी समितीसाठी शासनाने पूर्वीच कमी पदे मंजूर केली आहे. या विभागातील कामाच्या व्यापानुसार पदे मंजूर नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण जास्त आहे. वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांची पाच ते सहा पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही भरण्यात आली नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक येतो.
......
एका प्रकरणासाठी लागतो दोन तासांचा वेळ
जात पडताळणी समितीकडे येणाऱ्या प्रकरणाला एकूण तीन टप्प्यातून जावे लागते. समितीच्या अध्यक्षांची प्रकरणावर स्वाक्षरी झाल्यानंतर हे प्रकरण मार्गी लावले जाते. साधारणपणे एक प्रकरण मार्गी लावण्यासाठी किमान दोन तासांचा कालावधी लागतो. अध्यक्षांकडे पाच ते सहा जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला दिवस वाटून दिले आहे. गोंदिया येथे ते सोमवारी असतात यावेळी ते अधिकाधिक प्रकरणे मार्गी लावत असल्याची माहिती आहे.
......
१२०० वर प्रकरणे दाखल
जिल्हा जात पडताळणी विभागाकडे सध्या स्थितीत हजारावर प्रकरणे दाखल आहेत. तर या विभागात सध्या स्थितीत सात अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे. कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कामाचा ताण अधिक आहे. मात्र यानंतरही दररोज ७० ते ८० प्रकरणे मार्गी लावली जात असल्याची माहिती आहे.
....
कोट :
मुलाच्या पुढील उच्च शिक्षणासाठी मी जातपडताळणी विाभागाकडे पंधरा दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. पण अजूनही माझे प्रकरण मार्गी लागायचे आहे. प्रकरण मार्गी लागल्यास पुढील काम करण्यास मदत होईल.
- सोमाजी बांबोडे, दासगाव
......
जात पडताळणी समितीकडे येणारी प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाय कोणतेही प्रकरण प्रलंबित राहू नये यासाठी आम्ही काळजी घेतो. अर्जांमध्ये त्रुट्या नसल्यास प्रकरणे त्वरीत मार्गी लावली जातात. त्रुट्यांमुळेच प्रकरण मार्गी लागण्यास वेळ लागतो. -
देवसूदन धारगावे, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती.