बाजार समितीत धानाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:52 PM2017-12-10T21:52:00+5:302017-12-10T21:52:42+5:30
कमी पाऊस व होत्या त्या धानावर कीड रोगांचा हल्ला यामुळे यंदा जिल्ह्यात धानाच्या उत्पादनात घट झाली आहे.
कपिल केकत।
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : कमी पाऊस व होत्या त्या धानावर कीड रोगांचा हल्ला यामुळे यंदा जिल्ह्यात धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक घटली असून बाजार समिती ओस पडली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्थिती अधीकच गंभीर असल्याचे दिसून येत आहे.
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्याची ही ओळख आता हिरावत चालली आहे. यंदा पाऊस कमी पडल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात रोवणी झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील धानाचे उत्पादन घटणार हे कळून चुकले होते. मात्र लागलेल्या धानपिकावर कीड रोगांनी हल्ला चढवून उभ्या धानाची नासाडी केली. यामुळे अपेक्षीत उत्पन्नापेक्षाही कितीतरी पटीने धानाचे उत्पादन यंदा घटले.
याचेच परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणवत आहे. यंदा बाजार समितीने आॅक्टोबर महिन्यापासून धान खरेदी सुरू केली. तेव्हापासूनच बाजार समितीत धानाची आवक घटल्याचे चित्र खुद्द बाजार समिती प्रशासनाला जाणवत आहे. मागील वर्षी याच दिवसांत जेथे बाजार समिती धानाने भरभरून होती. तेथेच आज बाजार समितीत शुकशुकाट जाणवत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्के पेक्षाही कमी धान बाजार समितीत विक्रीला आल्याचे दिसून येत आहे.
उत्पादनात घट असल्यास त्या वस्तूची मागणी वाढते असा नियम आहे. येथे मात्र धानाचे उत्पादन घटले असतानाही धानाचे भाव वाढलेले नाहीत. शिवाय कर्जमाफीचा गवगवा होत असतानाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. यामुळे ही संपुर्ण स्थिती निर्माण झाल्याचेही बाजार समितीत बोलले जात आहे. विशेष म्हणजे, धान विक्रीला न येणे हे चित्र फक्त बाजार समितीतच नसून आधारभूत धान खरेदी केंद्रांचीही हीच स्थिती असल्याची माहिती आहे. यामुळेच आजघडीला बाजार समितीत धानाची आवक घटली आहे.
धान खरेदीत मोठी घसरण
मागील वर्षी सन २०१६ मध्ये आॅक्टोबर महिन्यात बाजार समितीत २२ हजार क्विंटल यात ३१ हजार ५४८ पोती धानाची खरेदी करण्यात आली होती. तर नोव्हेंबर महिन्यात ५१ हजार २७१ क्विंटल यात ७३ हजार २४४ पोती धानाची खरेदी करण्यात आली होती. यंदा मात्र सन २०१७ मध्ये आॅक्टोबर महिन्यात ८ हजार ६४० क्विंटल यात १२ हजार ३४२ पोती धानाची खरेदी करण्यात आली आहे. तर नोव्हेंबर महिन्यात ३५ हजार ५५८ क्विंटल यात ५० हजार ७९७ पोती धान खरेदी करण्यात आली आहे. वरिल आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बाजार समितीच्या धान खरेदीत मोठी घसरण दिसून येत आहे.