परराज्यातून आणलेल्या दारूचा साठा पकडला
By admin | Published: June 8, 2016 01:34 AM2016-06-08T01:34:12+5:302016-06-08T01:34:12+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून अवैधपणे चोरट्या मार्गाने गोंदियाच्या हद्दीत
गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून अवैधपणे चोरट्या मार्गाने गोंदियाच्या हद्दीत विक्रीसाठी आणलेला हलक्या मद्याचा साठा जप्त केला आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक नितीन धार्मिक व त्यांच्या चमूने ही कारवाई केली.
महाराष्ट्रात मद्यावर कर असल्यामुळे लगतच्या मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यातील कमी दर्जाची दारू येथे आणून चढ्या दराने विक्री करण्याचा गोरखधंदा काही प्रमाणात होतो. तो हाणून पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली. यादरम्यान सोमवारी (दि.६) सायंकाळी ७.३० वाजता अधीक्षक धार्मिक यांच्या नेतृत्वात पथकाने फुलचूरमधील सेल्स टॅक्स कॉलनीत किरायाने राहणाऱ्या आरोपीच्या घरी धाड टाकली.
या यशस्वी छाप्यात मध्यप्रदेश निर्मित सिल्वर जेट कंपनीच्या ७५० मिलीच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील मद्य महाराष्ट्रातील इम्पेरियल ब्लू या कंपनीच्या १८० मिलीच्या १३६ बाटल्या व मॅकडॉल नंबर १ व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २३७ बाटल्यांमध्ये सीलबंद करून ठेवल्याचे आढळून आले. तसेच इम्पेरियल ब्लू या ब्रॅन्डच्या ३७० कॅप (झाकणे) व मॅकडॉल नंबर १ व्हिस्की या ब्रॅन्डचे ४८५ झाकणे मिळून आलेत. यावरून या ठिकाणी बनावट विदेशी ब्रॅन्डचे मद्य तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील आरोपी नितीन उर्फ निर्मल जयपाल होतचंदानी, रा.गोरेगाव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक भगत, सहा.दु. निरीक्षक हुमे, जवान पागोटे व वाहनचालक सोनबर्से यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)