सावधान अजूनही कोरोनाचे भय संपलेले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:32+5:302021-06-02T04:22:32+5:30
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यासह केशोरी कनेरी या ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्ण कोरोना विषाणूच्या आजाराने ग्रस्त झाले होते. ...
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यासह केशोरी कनेरी या ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्ण कोरोना विषाणूच्या आजाराने ग्रस्त झाले होते. अनेकांना जीव गमवावा लागला. याची वेळीच प्रशासनाने दखल घेऊन केशोरी कनेरी ही दोन्ही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून ये-जा करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आली होती. याचेच फलित म्हणून गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली. मात्र, अजूनही सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोनाचे अजूनही भय संपलेले नाही. याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. याचा प्रत्यय सार्वजनिक ठिकाणी आणि बँकेत लोकांची गर्दी दिसून येत आहे. तालुका प्रशासनाने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करून आवागमनासाठी केशोरी-कनेरी या ठिकाणी प्रतिबंध लावण्यात आली होती. प्रशासनाने वेळोवेळी कोरोना वाढीवर उपाययोजना अमलात आणून कोरोना संपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सध्या कोरोना महामारी आटोक्यात आली असून नागरिकांना असेच प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे; परंतु काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी आणि बँकेत विनाकारण गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने १५ जूनपर्यंत महत्त्वाच्या काही बाबी शिथिल करून लॉकडाऊन वाढविला आहे. याचा अर्थ असा नाही की, बिनधास्त नागरिकांनी संचार सुरू करून पुन्हा कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार होऊ नये. केशोरीवासीयांनो सावधान, अजूनही भय संपलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी आणि बँकेत विनाकारण गर्दी करू नका. मास्क आणि सामाजिक अंतराचे नियम काटेकोरपणे पालन करा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.