जिल्हा परिषद सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 12:57 AM2017-04-06T00:57:09+5:302017-04-06T00:57:09+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये झालेल्या हमरीतुमरी व कथित

The CCTV cameracht closed in the Zilla Parishad hall | जिल्हा परिषद सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद

जिल्हा परिषद सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद

Next

फुटेजच नाही : मारहाणीच्या प्रकाराचा उलगडा कठीण
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.३) जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये झालेल्या हमरीतुमरी व कथित मारहाणीच्या प्रकाराचा नेमका उलगडा करण्यासाठी ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पोलिसांची भिस्त होती ते कॅमेरेच बंद असल्याची आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहणे पोलिसांपुढेही आव्हान ठरले आहे.
असंवैधानिक भाषेवरुन उठलेल्या वादात भर सभागृहात शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवत आणि महिला सदस्य सुनिता मडावी यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा सदस्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले. तर दुसरीकडे सुनिता मडावी यांना जातीवाचक शिविगाळ केल्याचा ठपका ठेवत सभापती कटरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने शाब्दिक चकमकीवरून प्रकरण अंगावर धावण्यापर्यंत पोहोचले. पण यात परस्परांविरूद्ध लावलेले आरोप कितपत सत्य आहेत हे तपासण्यासाठी सभागृहात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील व्हिडीओ क्लिप महत्वाचा पुरावा ठरणार होती. मात्र ते कॅमेरेच बंद असल्यामुळे झालेल्या प्रकाराचा नेमका पुरावा कोणाकडेही नाही. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात ४ सी.सी. टीवी कॅमेरे आहेत. अध्यक्ष व सर्व सभापती ज्या मंचावर बसतात त्या ठिकाणी एक कॅमेरा व स्टेजच्या दोन्ही बाजूला दोन कॅमेरे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

मग कॅमेरे लावलेच कशाला?
सभागृहातील कामकाज गुप्त ठेवण्यासाठी हे कॅमेरे जि.प.च्या सभेत सुरू नसतात असे जि.प.च्या वतीने सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जर तसे असेल तर मग सभागृहात कॅमेरे लावलेच कशासाठी? हा प्रश्न उपस्थित होतो. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून जि.प.च्या सर्वसाधारण सभांमध्ये पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीच वाढले आहे.
काँग्रेस म्हणते, कारवाई करा!
दरम्यान या प्रकरणी सभापती कटरे यांच्यावर राकाँच्या कवलेवाडा क्षेत्राच्या सदस्य सुनिता मडावी यांच्यामार्फत राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी सुनियोजित कट करून हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी केला आहे. त्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

 

Web Title: The CCTV cameracht closed in the Zilla Parishad hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.