शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखरेखीअभावी निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:27 AM2021-08-01T04:27:10+5:302021-08-01T04:27:10+5:30
आमगाव : राज्यात अनेक ठिकाणी कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी वृत्तीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. आमगाव शहरातसुद्धा चोरी, ...
आमगाव : राज्यात अनेक ठिकाणी कोरोनामुळे बेरोजगारी वाढल्याने गुन्हेगारी वृत्तीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. आमगाव शहरातसुद्धा चोरी, अवैध रेती वाहतूक तसेच इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे जिल्ह्यातील पहिले पोलीस ठाणे असलेले आमगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व्यवस्था ही वाऱ्यावर आली आहे.
शहरात गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत होते. मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी आमगावच्या चौकाचौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे निकामी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या सीमेलगत व छत्तीसगडपासून जवळ असलेल्या आमगाव शहरात परराज्यातील गुन्हेगारांचा शिरकाव होतो. त्यामुळे चोऱ्या, दरोडे, घरफोडी, अवैध वाहतूक होत असते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने व व्यापारी संघटना तसेच नागरिकांच्या पुढाकाराने आमगाव शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. शहरातील आंबेडकर चौक, गांधी चौक, कामठा चौक अशा ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले होते. यामुळे प्रत्येक चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्याची चित्रफीत कॅमेराबद्ध होत होती. परराज्यातील येणाऱ्या गुन्हेगारांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नजर ठेवली जात असे. परंतु देखरेखीअभावी हे सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत.
......
दुरुस्तीचा खर्च कुठून करायचा
मागील काही महिन्यांपासून हे कॅमेरे बंद आहेत. यांच्या दुरुस्ती व देखरेखीची जबाबदारी पोलीस विभागाकडे होती. परंतु देखरेखीचा खर्च व दुरुस्तीचा खर्च करणार कुठून? यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून आहेत. कोणताही मोठा गुन्हा, चोरी, खून अशा गंभीर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला जातो. मात्र हे सीसीटीव्ही कार्यरत नसल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.