सौंदड शासकीय गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:29 AM2021-09-03T04:29:01+5:302021-09-03T04:29:01+5:30
सडक अर्जुनी : तालुक्यातील सौंदड येथील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याची तक्रार माजी मंत्री राजकुमार बडोले ...
सडक अर्जुनी : तालुक्यातील सौंदड येथील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याची तक्रार माजी मंत्री राजकुमार बडोले यांना प्राप्त झाली होती. याच अनुषंगाने त्यांनी बुधवारी सौंदड येथील शासकीय गोदामाला भेट देऊन पाहणी केली असता गोदामात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळले. सोयी सुविधांचासुध्दा अभाव आढळला.
सौंदड येथील गोदामात पब्लिक डिस्ट्रीब्युटर सिस्टीमअंतर्गत तीन गोदामांमध्ये एक हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता आहे. गोदामामध्ये लाईट लागलेले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. कस्टमर मिल राईस (सीएमआर) योजनेंतर्गत पाच गोडाऊन असून, त्यांची क्षमता एक हजार मेट्रिक टन आहे. त्यात शंभर क्विंटलपेक्षा कमी तांदूळ आढळला. धान्याचा साठा रजिस्टर अद्ययावत नव्हते. यासह अनेक त्रुटी आढळल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांची एकही भेट साठा रजिस्टरवर नसल्याची बाब पुढे आली. दुसरे शासकीय गोदाम महिला औद्योगिक सहकारी संस्थेने भाड्याने घेतले असून, त्यांच्याकडून जिल्हा पुरवठा विभागाने भाड्याने घेतले आहे. परंतु शासकीय धान्य साठवणूक गोदाम कोणत्याही निकषात बसत नसून त्या ठिकाणी योग्य रस्ते नसून कोणत्याही सुविधा नसल्याचे लक्षात आले. दोन्ही गोदामातील धान्याच्या अद्ययावत नोंदी नसल्याचे निदर्शनास आले.
............
जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी दखल
बाहेरून निकृष्ट दर्जाचे धान्य येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच या गोदामात कार्यरत असलेले गोडाऊन किपर व इतर जिल्ह्यातून तांदळाचा दर्जा तपासण्यासाठी आलेले तपासणी अधिकारी केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.