शहर येणार सीसीटीव्हींच्या निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:04 PM2018-08-06T22:04:09+5:302018-08-06T22:04:32+5:30
शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य भागांत सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील ४० जागांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. पोलीस मुख्यालयात यासाठी कंट्रोल रूम तयार केले जाणार असून पोलिसांची या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य भागांत सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील ४० जागांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. पोलीस मुख्यालयात यासाठी कंट्रोल रूम तयार केले जाणार असून पोलिसांची या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.
काही वर्षांपूर्वी शहरातील सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला होता व त्यात दुकान संचालकांवर गोळी झाडण्यात आली होती. याशिवाय सराफा दुकानाच्या चौकीदाराचा खून करण्यात आल्याची घटनाही शहरात घडली आहे. याशिवाय अन्य गुन्हेगारी कारवाया शहरात नित्याच्याच झाल्या आहेत. शहरातील या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी सीसीटीव्ही लावणे अत्यंत आवश्यक झाले होते. यामुळे आमदार गोपालदास अग्रवाल जिल्हा नियोजन समितीकडे शहरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती.
तसेच यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटींचा निधी मंजूर करवून घेतला होता. मात्र पोलीस विभागाकडून वेळेत निधी खर्च करण्यात आली नाही. परिणामी सन २०१४ पासून हा निधी पोलीस विभागाकडे जमा होता. शहरात सीसीटीव्ही लावणे अत्यंत गरजेचे झाले असल्याने आमदार अग्रवाल यांनी अखर्चित निधी खर्च करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळवून घेतली. त्यामुळे आता शहरात सीसीटिव्ही लावण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे.
शहरातील ४० जागांवर ९० सीसीटिव्ही लावले जाणार असून यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयात या सीसीटीव्हींचे कंट्रोल रूम तयार केले जात असून तेथे बसून अधिकारी शहरातील हालचालींवर नजर ठेवणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट पोलीस अधिकाऱ्यांची नजर राहणार असल्याने नक्कीच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चार मुख्य चौकांत ट्राफिक सिग्नल
गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा प्रयोग केला जात असतानाच शहरातील वाढती व विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहरात चार मुख्य चौकांत ट्राफिक सिग्नल लावले जाणार आहेत. यात, जिल्हा परिषद चौक, फुलचूर नाका, पोलीस मुख्यालय चौक व बायपास रिंग रोड चौकात (बालाघाट रोड) हे ट्राफिक सिग्नल लावले जाणार आहेत. शहरातील हे मुख्य व अत्यंत वर्दळीचे मार्ग असून येथे कित्येक अपघात घडले आहेत. ट्राफिक सिग्नल लावल्याने अपघातांच्या घटना नियंत्रणात येणार आहेत.