एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:19+5:30
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गॅस कटरने एटीएम फोडल्याच्या घटना घडत असून यातून एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँक व्यवस्थापनाला दिले होते. मात्र या आदेशाची सुद्धा सर्रासपणे पायमल्ली केली जात असून गोंदिया शहर व जिल्ह्यातील बहुतांश एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचाच वॉच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती असून व्यापारी नगरी म्हणून गोंदिया शहर प्रसिद्ध आहे. शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा केली आहे.
कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून एटीएम देखील सुरक्षीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापल्याची घटना घडली. या घटनेनंतर एटीएम व एटीएममधून पैसे काढणे किती असुरक्षीत आहे याची प्रचिती शहरातील काही एटीएमला भेट देवून पाहणी केल्यानंतर निदर्शनास आली. शहरातील एटीएमच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता बहुतेक एटीएम मध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे आढळले.
शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटिव्हीच्या निगरानीत असल्याचे आढळले. एटीएम शहरातील मुख्य परिसरात असल्याने त्यांना फोडण्या सारख्या घटना घडणे तेवढेही शक्य नसल्याचे दिसले. मात्र बँक आॅफ महाराष्ट्रचे दुर्गा चौकातील दुर्गा मंदिराच्या बाजूला असलेले एटीएम सुरक्षेच्या निकषांत बसत नसल्याचे दिसले.
येथे गार्ड नसल्याने कुणीही या मशीन वापरा व निघून जा असे चित्र आहे. याशिवाय स्टेट बँकेच्या मुख्य शाखालगत असलेले एटीएम सुरक्षारक्षकाविनाच दिसले. बाजारातील एक्सीस बँक, इलाहाबाद बँक यांचेही एटीएम दिवसाच काय रात्रीलाही सुरक्षा रक्षकाविना असतात.
अन्य बँकांना सीसीटीव्हीचाच आधार
जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयटीआयसीआय व एक्सीस बँकेच्या एटीएमला सीसीटिव्हीचाच आधार असल्याचे दिसून आले. बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटिव्ही लागलेले असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, एटीएम मशीन्सची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतानाच एटीएममध्ये गुन्हेगारीचे प्रकारही घडत आहेत. अशात एटीएम व ग्राहक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही हा एकमेव पर्याय किती सुरक्षीत आहे हा मात्र प्रश्न सर्वांना पडत आहे.