आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:18+5:302021-06-16T04:38:18+5:30
गोंदिया : एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून हे शक्य आहे. यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. या महाकार्यात ...
गोंदिया : एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून हे शक्य आहे. यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. या महाकार्यात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा असे प्रतिपादन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने सोमवारी (दि. १४) केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित जागतिक रक्तदान दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी रक्तदान जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरीश मोहबे यांचे हस्ते रक्तगटाचा शोध लावणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ लॅण्ड स्टीनर यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रक्त मित्र व नगरसेवक लोकेश यादव, डॉ. सुवर्णा उपाध्याय, डॉ. मीना वत्ती, अजित सिंग, पारस लोणारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. हुबेकर यांनी, कुठला ही निरोगी युवक दर ३ महिन्यांनी नियमित रक्तदान करू शकतो. रक्तदान केल्याने नवीन रक्त शरीरात तयार होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. जिल्ह्यात सिकलसेल, थॅलेसिमिया, मलेरिया आदी आजारांचे रुग्ण जास्त असल्याने येथे रक्ताची मागणी जास्त आहे. परंतु आदिवासी व दुर्गम भाग असल्याने रक्तदान कमी प्रमाणात होते. त्यामुळे रक्ताची मागणी जास्त व पुरवठा कमी असल्यामुळे नेहमी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असतो. त्यातच बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दररोज अवघड प्रसूती व इतर शस्त्रक्रिया रक्तस्त्राव व इतर गुंतागुंतीत खूप रक्ताची आवश्यकता लागते. अशावेळी नातेवाईकांची रक्तासाठी धावाधाव होते. करिता युवकांनी नियमितपणे रक्तदान करावे असे सांगितले.
तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहबे यांनी, युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे, ज्यामुळे रक्त अभावी कुणाचे ही प्राण भविष्यात जाणार नाही असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक व रक्त मित्र यादव यांचा विश्व रक्तदान दिनानिमित्त शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.