भिंत फोडून मोबाईल गॅलरीतून पाच लाखाचे मोबाईल चोरी; २८ ॲन्डड्राईड मोबाइल केले साफ
By नरेश रहिले | Published: October 2, 2023 08:09 PM2023-10-02T20:09:17+5:302023-10-02T20:10:10+5:30
आमगावच्या पाणी टाकी जवळील घटना
नरेश रहिले, गोंदिया: आमगावच्या पाणी टाकी जवळील शिवणकर चाळ मध्ये असलेल्या पवार मोबाईल गॅलरीच्या मागणी भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ७ ते ८ लाख रूपये किंमतीचे मोबाईल पळविल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला ता. आमगाव यांच्या पवार मोबाईल गॅलरीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली.
आमगावच्या गांधी चौक ते कामठा चौक दरम्यान असलेल्या जून्या पाणी टाकीच्या जवळ शिवणकर चाळ आहे. या चाळमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पवार मोबाईल गॅलरी उघडण्यात आली. १ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या मोबाईल गॅलरीच्या मागील भागाची भिंत तोडून त्या मोबाईल गॅलरीतून अत्यंत महागडले असलेले २८ मोबाईल पळविले. त्या मोबाईलची किंमत ५ लाखाच्या घरात सांगितली जाते. या मोबाईल गॅलरीचे मालक दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला हे २ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांच्या दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.
आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईलवर आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क केला. माहिती मिळताच आमगावचे ठाणेदार युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर पर्वते व इतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गोंदियावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु दुकानाच्या मागच्या भागात पावसाचे पाणी साचले असल्यामुळे श्वास त्याच ठिकाणी थांबला. गोंदियावरून फिंगरप्रिंट व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहीपर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस अधिक्षकांनी केला दौरा
आमगाव पोलीस ठाण्याचे नियमीत निरीक्षण असल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांचा आमगाव पोलीस ठाण्याचा दौरा होता. परंतु या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी आमगाव पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. कोणत्या पध्दतीने आरोपींनी चोरी केली त्याचा तपास कश्यापध्दतीने करावा यासंदर्भात संबधीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
छोटा छिद्र करून केली चोरी
या मोबाइल गॅलरीच्या मागची भिंत जिर्ण असल्याने त्या जिर्ण भिंतीला सब्बलने खड्डा करुन १० ते १२ वर्षाचा मुलगा आत जाईल एवढाच छिद्र तयार केला. त्या छिद्राला पाहून सडपातळ व्यक्तींनी आत प्रवेश करून ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.