आमगाव-कामठा राज्यमार्गाचे सिमेंटीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:47+5:302021-09-25T04:30:47+5:30
आमगाव : बालाघाट-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम रावणवाडी येथून कामठा होत आमगावपर्यंत जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३६५ ची अत्यंत ...
आमगाव : बालाघाट-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम रावणवाडी येथून कामठा होत आमगावपर्यंत जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३६५ ची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत. अशात या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक यांची गुरुवारी (दि. २३) मंत्रालयात भेट घेऊन केली. यासाठी त्यांनी सैनिक यांना निवेदनही दिले आहे.
आमगाव-कामठा रस्ता बांधकामाची मागणी घेऊन येथील नागरिकांनी आमदार डॉ. फुके यांची भेट घेतली होती. यावर डॉ. फुके यांनी हा विषय थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सैनिक यांच्याकडेच मंत्रालयात भेट घेऊन मांडला. या भेटीत आमदार फुके यांनी, गोंदिया तालुक्यातील ग्राम रावणवाडी ते कामठा होत आमगाव शहरापर्यंत जाणाऱ्या राज्य महामार्गावर ग्राम बिरसी येथे विमानतळ व पायलेट प्रशिक्षण केंद्र आहे. परंतु या रस्त्याची दुर्दशा झाली असून पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. अशात या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची गरज आहे. जेणेकरून हा महत्त्वपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा होणार, अशी मागणी केली. यावर सैनिक यांनी विषय लक्षात घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार फुके यांना दिले आहे.