ग्रामीण भागातही सिमेंटच्या घरांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 09:04 PM2018-06-17T21:04:58+5:302018-06-17T21:04:58+5:30
आधुनिक काळात शहरांसोबत ग्रामीण भागही बदलत आहे. शहरातल्या साऱ्याच बाबी आता ग्रामीण भागात दिसू लागल्या आहेत. घरांच्या बाबतीत नेमके तेच चित्र असून शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही सिंमेटची घरे तयार केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधुनिक काळात शहरांसोबत ग्रामीण भागही बदलत आहे. शहरातल्या साऱ्याच बाबी आता ग्रामीण भागात दिसू लागल्या आहेत. घरांच्या बाबतीत नेमके तेच चित्र असून शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही सिंमेटची घरे तयार केली जात आहे.
प्राचीन काळापासून खापराने मनुष्य जीवनात व साहित्यात महत्वाचे स्थान मिळविले. परंतु, आधुनिकीकरणाच्या वेगात भारतीय ग्रामीण जीवनाची विशेष खूण असलेल्या खापराचे मूळ लहान कवेलू नामशेष झाले आहेत. शहरासोबत आता ग्रामीण भागातही सिमेंटची घरे उभी झाली आहेत. मात्र खापर आपल्या समाजजीवनाचे अविभाज्य भाग झाले आहे. खापराविषयी वाक्प्रचारही आहेत. खापर डोक्यावर फुटणे, डोक्यावर खापर फोडणे. लोकगीतांमध्ये खापराचा उल्लेख आहे. खापराचा मूळ अर्थ मडक्याचा तुकडा असा असला तरी जुन्या काळातील लहान कवेलूंच्या तुकड्यांना मुख्यत: खापर म्हटले जाते. कालौघात लहान कवेलू दुर्मिळ झाल्यामुळे खापर फक्त साहित्यांतच राहिले आहे. जुन्या काळात खापरांंची घरे असायची. शेकडो वर्षांपासून घराचे छत लहान कवेलंूनी आच्छादन्याची पध्दत होती. मागील २०-२५ वर्षांपासून लहान कवेलंूचे उत्पादन बंद झाल्यामुळे काही जुनी घरे वगळता खपरेल नजरेस पडत नाही.
पूर्वीच्या काळी वाडे, हवेली किंवा सामान्यांची घरे लहान कवेलूंची असत. शेकडो वर्षांपूर्वी ज्यांनी या कवेलूंचा शोध लावला व घरांवर कवेलू रचण्याची पद्धती अंमलात आणली, त्यांना निश्चितपणे विज्ञान माहिती होते. छतावर कवेलंूचा पहिला थर उंच, धड खाली असा रचून त्यावर खोलगट भाग खाली येईल, अशा पद्धतीने दुसरा थर लावण्यात येत असे.
घराचे छत उंच असल्यामुळे व माती उष्णतेची वाहक नसल्याने वरचे कवेलू उन्हाळ्यात तापले तरी खालचे कवेलू थंड असते. त्यामुळे जुन्या काळाची घरे थंड राहत होती. आता कवेलूंची घरे राहिली नाहीत. खापरांचे तर उत्पादन थांबले. थोड्याफार प्रमाणात बेंगलोरी कवेलूंचा वापर होतो.
लहान कवेलूंची बोटावर मोजता येण्यासारखी घरे आहेत. उन्हाळ्यात मडके किंवा रांजन बनविणारा कुंभारवर्ग इतरवेळी शेतमजुरीचे काम करतो.
ग्रामीण अर्थव्यवस्था कशी उदध्वस्त होत गेली, याचे हे एक उदाहरण आहे. संस्कृतमध्ये खर्पर, हिंदीत पंखाकी, प्राकृत भाषेत खाप्पर, बंगाली भाषेत खापर पंजोबा, खापर पणतु, खापर, खापर तोड, खाफर फुकी, खापर सुप आणि हातपाय घासणे, यांची खुटी अशा अनेक शब्दांत खापरांचा उल्लेख होता. ग्रामीण भागात आता सर्वच बाबतीत बदल होत आहे. त्यात घरांच्याही बाबतीत तो होत आहे.