शिबिरातून महासमाधान
By admin | Published: August 12, 2016 01:30 AM2016-08-12T01:30:13+5:302016-08-12T01:30:13+5:30
आगामी महासमाधान शिबिरात ४० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा आपला संकल्प असून त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा ...
पालकमंत्री बडोले : विविध यंत्रणांनी नियोजन करून काम करावे
गोरेगाव/अर्जुनी-मोरगाव : आगामी महासमाधान शिबिरात ४० हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा आपला संकल्प असून त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी यंत्रणांनी योग्य नियोजन करून काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोरेगाव तहसील कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी महासमाधान शिबिराची तयारी करण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांशी चर्चा करताना ते बोलत होते.
या वेळी पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, लक्ष्मण भगत, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, गटशिक्षणाधिकारी कावळे, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता भांडारकर, तालुका आरोग्य अधिकारी कापगते, बाल विकास प्रकल्पाच्या श्रीवास्तव यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महासमाधान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गावपातळीवर अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना आजही मिळालेला नाही. या लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणांनी पोहोचून त्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने काम करावे. योजनांच्या लाभामुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तालुका पातळीवर योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार येण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम या शिबिराच्या लाभातून वाचण्यास मदत होईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापनातून मदत करणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्याबाबत संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. सुकन्या समृध्दी योजना, मुलींना सायकल वाटप यासह विविध योजना लाभार्थ्यांना कशा मिळतील, यासाठी यंत्रणांनी सामाजिक बांधिलकीतून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार डहाट यांनी महसूल विभागामार्फत महासमाधान शिबिरात नवीन शिधा पत्रिका, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, आम आदमी विमा योजना, जमीन शाखा वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रु पांतर करणे, आपसी वाटणीपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर व उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विभागामार्फत जमीन सुपिक प्रमाणपत्र, भूमि अभिलेखकडून क प्रत, महावितरणकडून शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता सिंगल फेस विद्युत कनेक्शन, कृषी पंप वीज कनेक्शन, वन विभागाकडून गॅस कनेक्शन, तेंदूपत्ता बोनस वाटप, वन्यप्राण्यांमुळे बाधित लोकांना लाभ देणे, बँकांकडून मुद्रा बँक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देणे, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळांच्या लाभार्थ्यांना लाभ देणे, मुलींना सायकल वाटप यासह विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
अर्जुनी मोरगाव येथे आढावा
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालय येथे ९ आॅगस्ट रोजी महासमाधान शिबिराची पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या वेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, परिविक्षाधिन उपवनसंरक्षक राहुल पाटील, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, नायब तहसीलदार कोकवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राऊत यांच्यासह तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री बडोले या वेळी म्हणाले, इंधनाच्या बाबतीत जंगलावरील असलेले अवलंबत्व कमी करण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत व वन विभागामार्फत गॅस कनेक्शनचा लाभ द्यावा. तालुक्यातील सहा गावांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचे नियोजन करावे. तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना स्वावलंबी करण्यासाठी मुद्रा बँक योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. वनहक्क जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना लवकरात लवकर कसे देता येईल यादृष्टीने त्रुटीची पूर्तता करून लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.