नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:34 PM2017-09-29T23:34:52+5:302017-09-29T23:35:01+5:30
जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, तहसील आणि उपविभागीय कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातील ३४७ सरपंच आणि २ हजार ९३९ सदस्य पदांसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने यावर्षीपासून नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच सहा दिवसांत केवळ २१० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारपासून नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे चित्र होते.
गुरूवारी सर्व केंद्रांवर सरपंच पदासाठी २२७ तर सदस्य पदासाठी ९७० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. तर शुक्रवारी सकाळी १० वाजतापासूनच जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी गर्दी केली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती उमेदवारांनी शुक्रवारी नामाकंन अर्ज दाखल केले याची माहिती कळू शकली नाही.
अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. भारनियमन, लिंक फेलमुळे अर्ज भरण्यास फार विलंब झाला. नामाकंन अर्ज दाखल करणाºया उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र लिंक फेलच्या समस्येमुळे अनेक उमेदवार नामाकंन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ग्रामीण भागात भारनियमन सुरुच
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. याचा फटका आॅनलाईन नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला बसला. शुुक्रवार नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधित भारनियमन असल्याने नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. निवडणुकीच्या कालावधित भारनियमन बंद करण्याच्या मागणीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.