१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी केंद्र वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:21+5:302021-05-10T04:29:21+5:30
गोंदिया : जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना १ मे पासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ पाच केंद्रांवर ...
गोंदिया : जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना १ मे पासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. शनिवारी (दि.८) १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्यात येणार असून आता ५० केंद्रांवरून मंगळवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सध्या आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८० हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, तर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील २९६७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण पाच लसीकरण केंद्रावरून सुरू होते. लसींचे कमी डोस प्राप्त झाल्याने ही संख्या कमी ठेवण्यात आली होती. मात्र, शनिवारी ८ हजार लसीचे डोस प्राप्त झाल्याने केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील १० ग्रामीण रुग्णालय आणि ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी नियोजन आरोग्य विभागाने केले असून त्या संबंधीच्या सूचनासुद्धा संबंधित केंद्रांना करण्यात आल्या आहेत.