केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:20 PM2018-11-26T22:20:23+5:302018-11-26T22:20:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : येथील धान खरेदी केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांना धान स्थानिक व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : येथील धान खरेदी केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांना धान स्थानिक व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शासनाची फसवेगीरी समोर येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्याला धान्याचे कोठार म्हटले जाते. येथील बहुतेक नागरीक शेत पिकावर अवलंबून आहेत. सत्ताधाऱ्याकडून कारखाने किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करुन न दिल्याने येथील युवा पीढी कसी बसी शेतातील विविध पीक घेवून आपली उपजिविका चालवितात. पण शासनाकडून धान खरेदी केंद्राच्या नावावर शेतकऱ्यांशी थट्टा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र कालीमाटी अंतर्गत घाट्टेमनी, गिरोला, टाकरी, टेकरी, कातुर्ली, मोहगाव, भोसा, पोकरटोला, करंजी, कालीमाटी, कट्टीपार, सुपलीपार, मुंडीपार, सितेपार, रामजीटोला, मरारटोला, ननसरी, गोसाईटोला, डोंगरगाव, बंजारीटोला, नंगपुरा, बोदा, आमगाव केंद्रातील माल्ही, महारीटोला, बनगाव, रिसामा, पदमपूर, पिपरटोला, सावंगी, बोरकन्हार, अंजोरा, वळद, भालीटोला, कवळी, सावंगी, चिचटोला, वाघडोंगरी, किकरीपार, कटंगीटोला, बाम्हणी, धामनगाव, नवेगाव, जांभुटोला, भजेपार आदी गावातील शेतकºयांना धान विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात विक्री करावा लागत आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे केंद्रीय गोदाम तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीने भाड्याने घेतले आहे. पण सदर गोदाम धानाने भरले आहे.
त्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना करायची असते पण १७ नोव्हेंबरपासून उचल झाली नाही. गोदामात २ हजार ५०० पोती म्हणजेच सुमारे १३०० क्विंटल धान आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडलेले असून खरेदी बंद करण्यात आली आहे.
कारण खरेदी-विक्री सोसायटीला गावात भाड्यावर गोदाम देण्यास कुणीही तयार नाही. आमगावात गोदाम उपलब्ध आहेत, पण भाड्याने देण्यास नागरिक किंवा व्यापारी इच्छुक नाही.
यात मात्र शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून त्वरित केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार नसून ती फसवणूक करीत आहे. हमी भावाच्या नावावार व्यापारीकरण सुरु आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी वर्ग धान्य विकत असल्याने घाम काढणारा शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार. शासनाने शेतकºयांचे हित पाहून केंद्र त्वरित सुरु करावे.
-सुरेश हर्षे, जि.प. सदस्य
-----------------------
खरेदी विक्री समितीच्यावतीने जिल्हा फेडरेशनकडे लेखी कळविले आहे. त्यांनी गोदामाची व्यवस्था करण्यास सुचविले आहे. पण आम्ही वास्तविकता कळविलेली आहे व मालाची उचल करण्यास विनंती केली आहे.
-चौरागडे, समन्वयक, धान खरेदी केंद्र, आमगाव