गांगल्याची दंडार केंद्र सरकारच्या दरबारी
By admin | Published: January 16, 2016 02:07 AM2016-01-16T02:07:02+5:302016-01-16T02:07:02+5:30
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा म्हणून दंडार प्रचलित आहे.
कलेचा सन्मान : दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात होणार सादरीकरण
गोंदिया : पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसा म्हणून दंडार प्रचलित आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ही लोककला जिवंत ठेवण्याचे निरंतर कार्य गोंदिया जिल्ह्यातील दुलीचंद बुध्दे करीत आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यात त्यांना यश आले.
येत्या १७ जानेवारी रोजी भारत सरकारच्या वतीने नागपुरात आयोजित कला महोत्सवात तिरोडा तालुक्यातील गांगला गावातील १० ते १४ वयोगटातील मुलांची दंडार सादर केली जाणार आहे. नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड व महाराष्ट्र या पाच राज्याच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या सांस्कृतिक केंद्राच्या नियंत्रणाखाली ८ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजित कला महोत्सवात १७ जानेवारी रोजी दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत महाराष्ट्राची कला म्हणून गांगल्याची दंडार सादर करण्यात येणार आहे.
या दंडारीच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील शाहीर मधुकर बांते, झाडीपट्टीचे जीवनदादा लंजे, शैलेंद्र वनवे, शाहीर संकर चामट, मुन्ना शहारे, श्रीराम मेश्राम यांच्या गाणगवळणीने सुरूवात होणार आहे. जिल्ह्याचे नैसर्र्गिक वर्णन जीवनदादा लंजे हे ‘तुमडा गिता’च्या माध्यमातून करतील. ही दंडार वाचविण्यासाठी सेवानिवृत्त उपायुक्त अनिल देशमुख, अधिकारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, नागपूरचे दिलीप जायसवाल, इंजिनियर डी.यु.रहांगडाले, संदीप जैन, डॉ.अजय बिरनवार, विठ्ठलराव भरणे, लिलाधर पाथोडे प्रयत्नरत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)