बीजीडब्ल्यू रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीईओ संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:01 PM2019-04-16T22:01:58+5:302019-04-16T22:02:34+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णालय परिसर व आतील भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असल्याचे पाहुन सीईओ दयानिधी चांगले संतापले. त्यांनी यावरुन संबंधित अधिकारी आणि स्वच्छता कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. सीईओ दयानिधी यांच्या आकस्मिक भेटीने बीजीडब्ल्यू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत फार जुनी असून ती जीर्ण झाली आहे. इमारतीची उंची देखील कमी असल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी रुग्णालयाच्या महिला वॉर्डात साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची चांगली तारांबळ उडाली होती. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्दाकडे लोकमतने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचीच दखल घेत मंगळवारी सीईओ दयानिधी यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मिक भेट देवून पाहणी केली. तसेच मागील वर्षी पावसाळ्यात ज्या वॉर्डात पाणी साचले होते त्याची पाहणी केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. तर रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्दावरुन कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. तसेच रुग्णालयाचा परिसर त्वरीत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. यापुढे रुग्णालयाच्या आवारात केरकचरा आढळल्यास स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. यानंतर सीईओ दयानिधी यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांकडून तेथील समस्यांचा आढावा घेतला.