कृषी सहायकांचे साखळी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 01:50 AM2017-06-24T01:50:10+5:302017-06-24T01:50:10+5:30

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील

The chain of fasting of agricultural assistants continued | कृषी सहायकांचे साखळी उपोषण सुरूच

कृषी सहायकांचे साखळी उपोषण सुरूच

Next

आंदोलनाचा चौथा टप्पा : निवासी उपजिल्हाधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या भेटी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाभरातील कृषी सहायकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. हा त्यांच्या आंदोलनाचा चौथा टप्पा असून विविध पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या उपोषण मंडपाला भेटी देत आहेत.
उपोषण स्थळावरील कृषी सहायकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने ३१ मे २०१७ च्या शासन निर्णयानुसार स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती करून कृषी विभागातील ९ हजार ९६७ कर्मचारी-अधिकारी वर्ग करून कृषी विभागाला पांगळा करण्याचा कट रचला. सद्यस्थितीत कृषी विभागात सर्व संवर्गाची ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यातच ९ हजार ९६७ पदे काढून मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करणे हे कृषी विभागाचे वाटोळे करण्यासारखे आहे. पूर्वी मृद व जलसंधारण हे कृषी खात्याचे अविभाज्य अंग होते. परंतु आता वेगळे केल्याने कृषी विभागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
कृषी विभागात काम करणाऱ्या प्रत्येक संवर्गाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. कृषी सहायक अर्थात ज्या क्षेत्रीय कर्मचाऱ्याला कृषी विभागाचा पाया समजला जातो, त्या संवर्गाला शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणासाठी व कृषी खात्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे.
कृषी विभागाचे तुकडे करण्यापूर्वी संघटनेलाही विश्वासात घेण्यात आले नाही. अनेक कर्मचारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशात त्यांना निवृत्तीचा लाभ विभागाकडून मिळेल काय. पदोन्नती, सेवाज्येष्ठता, सेवा प्रवेश नियम, सेवाशर्ती आदी अनेक मुद्दे समोर असताना जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना वर्ग केल्यावर कृषी विभागाचा आकृतीबंध कसा राहणार आहे, हे शासनाने अजुनही स्पष्ट केले नाही. यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटना विविध टप्प्यांमध्ये आंदोलन करीत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांनी बुधवार (दि.२१) भेट दिली व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर शुक्रवार (दि.२३) सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांनी भेट दिली. तसेच आंदोलनाच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यांनी मागण्या रास्त असल्याचे सांगून त्याबाबत आपणही पाठपुरावा करू, असे सांगितले. तर यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीसुद्धा उपोषण मंडपाला भेट देवून संघटनेच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
उपोषणावर बसलेल्या कृषी सहायकांमध्ये पी.बी. काळे, पी.एम. सूर्यवंशी, जी.डी. नेवारे, जी.एन. घरत, ए.डब्ल्यू. खंडाईत, आर.एम. रामटेके, जी.सी. वाढई, बी.पी. डोंगरवार, आर.आर. भगत, जे.टी. मेंढे, व्ही.एन. गहाणे, एस.एस. लांडे, एस.वाय. ब्राह्मणकर, एम.के. कुंभलवार, डी.आर. पारधी, एस.के. गणवीर आदी अनेक कृषी सहायकांचा समावेश आहे.

 

Web Title: The chain of fasting of agricultural assistants continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.