गोंदिया पंचायत समितीचे सभापतीच ठोकणार शिक्षण विभागाला ६ डिसेंबरला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:47 AM2017-12-04T11:47:32+5:302017-12-04T11:49:43+5:30
पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाच्या विविध शिक्षकांच्या निलंबनाचे प्रस्ताव ६ ते ७ महिन्यांपासून जि.प. येथे पाठवूनही अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. तसेच शिक्षण विभागात अनेक रिक्त पदांसंदर्भात पत्र व्यवहार करुनही जिल्हा परिषदेकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयांतर्गत शिक्षण विभागाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुलूप ठोको आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, पंचायत समिती अर्जुनी मोरगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर येथील सहायक शिक्षक आर.के. फुलबांधे यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र.२०४८/१७ दि. १७ एप्रिल २०१७), जि.प. प्राथमिक शाळा माहुरकुडा येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए.एम. चौधरी यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र.२१८२/१७ दि.३ मे २०१७) व जि.प. प्राथमिक शाळा झाशीनगर येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक ए.के. खंडाते यांच्या निलंबनाचे प्रस्ताव (जा.क्र. २४१८/ दि.२५ मे २०१७) पुढील कार्यवाहीकरिता जिल्हा परिषद येथे पाठविण्यात आले आहे. परंतु अद्यापही सदर शिक्षकांच्या निलंबनाच्या प्रस्तावांवर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.
तसेच गट शिक्षणाधिकारी हे पदसुद्धा अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील शैक्षणिक व प्रशासकीय कार्यभारावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याबाबतसुद्धा पंचायत समितीच्या वतीने यापूर्वी विविध पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही सदर प्रस्तावांबाबत काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत कळले नसल्याचे सभापती शिवणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
पंचायत समिती अर्जुनी मोरगाव कार्यालयांतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या निलंबनाचे व स्वेच्छानिवृत्तीचे प्रस्ताव अद्याप निकाली काढण्यात आले नाही. तसेच शिक्षण विभागांतर्गत रिक्त पदे भरण्याची कार्यवाही अद्यापही करण्यात आली नाही.
त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात ६ डिसेंबर विभागात दुपारी १२ वाजता अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप ठोकून आंदोलन करणार, असा इशारा सभापती अरविंद शिवणकर यांनी दिला आहे.