जिल्हा बँकेत चलन तुटवडा
By Admin | Published: May 14, 2017 12:27 AM2017-05-14T00:27:31+5:302017-05-14T00:27:31+5:30
स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठ दिवसांपासून चलन तुटवडा असल्यामुळे नोकरदार कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
वेतनापासून वंचित : चलन पुरविण्याची खातेधारकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठ दिवसांपासून चलन तुटवडा असल्यामुळे नोकरदार कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्न सराईचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने संबंधित बँक शाखेला चलन पुलरवठा करुन नियमितपणे वेतन कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
येथे दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅप. बँकेची एकमेव शाखा असल्यामुळे या परिसरातील अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतनाचे खाते या बँक शाखेत असून यांचे मार्फतच वेतन करण्याची प्रचलित पद्धत आहे. ज्या दिवशी वेतन बँकेत जमा होतात त्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन अदा करणे आवश्यक असताना येथील बँक व्यवस्थापक चलन तुटवड्याची सबब सांगून वेतनापोटी फक्त दोन हजार रुपयांचा विड्राल देवून मोकळा होत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपयापर्यंत असतो आणि त्यांना सदर बँकेतून फक्त दोन हजार रुपये मिळत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन खर्चाचे व्यवहार आणि लग्न सराईचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर आरटीजीएसमध्ये रक्कम ट्रॉन्स्फर करणे सुद्धा बंद असल्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. जिल्हा बँक प्रशासनाने संबंधित बँक व्यवस्थापकाला कोणतेही आदेश नसताना आरटीजीएस ट्रॉन्सफर रक्कम करणे गेल्या तीन-चार दिवसापासून बंद केले आहेत.
याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देवून येथील बँक शाखेत चलन पुरवठा करुन आरटीजीएस करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खातेधारकांनी केली आहे.